• Wed. Mar 11th, 2026

    विशालचं सिनेस्टाईल अपहरण, फार्म हाऊसवर नेलं आणि…, नागपूर पोलिसांनी सापळा रचला, बालूचा टप्प्यात कार्यक्रम

    विशालचं सिनेस्टाईल अपहरण, फार्म हाऊसवर नेलं आणि…, नागपूर पोलिसांनी सापळा रचला, बालूचा टप्प्यात कार्यक्रम

    Nagpur Crime News : नागपुरात सावकाराने पैशांच्या वादातून एका प्रॉपर्टी डिलरचे अपहरण करून साथीदारांच्या मदतीने त्याला मारहाण केली. हुडकेश्वर पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रॉपर्टी डिलरची सुटका केली आणि सावकारासह चौघांना अटक केली. आरोपींनी विशाल उरकुडे यांचे अपहरण करून उमरेड मार्गावरील फार्म हाऊसमध्ये डांबले होते, तिथे त्यांना मारहाण करण्यात आली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    नागपूर : पैशांच्या वादातून सावकाराने साथीदारांच्या मदतीने प्रॉपर्टी डिलरचे अपहरण करून त्याला मारहाण केली. पोलिसांनी वेळीच शोध घेऊन प्रॉपर्टी डिलरची सुटका केल्याने अनर्थ टळला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी सावकरासह चौघांना अटक केली आहे. प्रवीण ऊर्फ बालू भाऊराव बुरकेवार, नीलेश अमृतराव नगरकर, नीलेश ज्ञानेश्वरराव तेलखंडे आणि राकेश हरीभाऊ अवचट अशी अटकेतील अपहरणकर्त्यांची नावे आहेत. विशाल शंकरराव उरकुडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली. विशाल यांना पत्नीच्या नोकरीसाठी आणि पुतण्याच्या शस्त्रक्रियेसाठी पैशाची गजर होती.

    विशाल उरकुडे यांनी 2022 मध्ये सावकार बालू याच्याकडून 30 लाख रुपये घेतले. याबदल्यात त्यांनी बहादुरामधील प्लॉट आणि नरसाळा परिसरातील चार दुकाने गहाण ठेवली. ते बालू याला महिन्याला 56 हजार रुपये द्यायला लागले. त्यांनी एकूण 13 लाख 44 हजार रूपये बालूला दिले. दरम्यान विशाल यांची आर्थिक परिस्थिती खालावली. त्यामुळे बालूला पैसे देण्यास ते असमर्थ झाले. त्यामुळे बालू संतापला. संपत्ती आपल्या नावावर करण्यासाठी बालू हा विशाल यांना धमकवायला लागला. त्याने विशाल यांच्या दुकानांवर ताबाही घेतला.

    बालू आणि त्याच्या साथीदारांनी मंगळवारी सकाळी विशाल यांचे अपहरण केले. त्यांना क्रमांकाच्या कारमध्ये डांबले. त्यांना मारहाण करायला सुरूवात केली. आरोपींनी विशाल यांना उमरेड मार्गावरील उंबरगांव येथील फार्म हाऊसमध्ये डांबले. तेथेही त्यांना काठीने मारहाण केली.

    दरम्यान, विशाल यांचे अपहरण झाल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. नातेवाइकांनी हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांना माहिती दिली. भेदोडकर यांनी विशाल यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. तो बंद होता. नातेवाईकांनी बालूबाबत माहिती देत त्याचा मोबाइल क्रमांक पोलिसांना दिला. पोलिसांनी बालूचे लोकेशन काढले. तो दिघोरी पुलाजवळ असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून विशाल यांची सुटका केली. पोलिसांनी बालूसह चौघांना अटक केली. पोलिसांनी चौघांना बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा