Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा ५००० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान धावणार असून, 22 जुलैपासून गट आरक्षणाला सुरुवात होणार आहे.
“गणपती उत्सव कोकणातील लोकांचा महत्त्वाचा सण मानला जातो. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या -तोट्याचा विचार न करता एसटी महामंडळ दरवर्षी जादा बसेस सोडते. यंदाही सुमारे 5000 जादा गाड्या कोकणात जाणार आहेत,” असे मंत्री सरनाईक म्हणाले.
जयंत पाटील यांना उद्देशून विधानसभा अध्यक्षांचं सूचक वक्तव्य? देवेंद्र फडणवीस यांचंदेखील मिश्किल वक्तव्य
या बसेसचे आरक्षण npublic.msrtcors.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच, बसस्थानकावर किंवा MSRTC Bus Reservation ॲपवरही आरक्षण करता येणार आहे. आषाढी एकादशीला एसटी महामंडळाने 5200 जादा बसेस सोडल्या होत्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के आणि महिलांना 50 टक्के सवलत मिळणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर विभागातून 23 ऑगस्टपासून या जादा बसेस सुटणार आहेत. मागील वर्षी 4300 बसेस सोडल्या होत्या. गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयाबद्दल कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांकडून समाधान व्यक्त केलं जात असून या गणेशभक्तांना आतापासून गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत.

