Jayant Patil : विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर येताना दिसत आहे. जयंत पाटील आज एका योजनेच्या मुद्द्यावरुन भूमिका मांडत होते. यावेळी राहुल नार्वेकर यांनी एक वक्तव्य केलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मिश्किल प्रत्युत्तर दिलं. त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.
“नवीन सरकार आल्यावर ही योजना पुढे चालू ठेवण्याबाबत त्यांनी मागणी केली. आम्ही सांगितलं की, मंडळाने निर्णय घ्यावा. पप्पू यादव चेअरमन होते. माझा मुद्दा हा आहे, उत्तराच्या आधी हरकत कशी? तुम्ही किती अस्वस्थ झाला आहात”, असं जयंत पाटील म्हणत होते. याचवेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, “जयंत पाटील सध्या तरी तुम्ही फक्त प्रश्न विचारु शकतात. उत्तर द्यायच्या भूमिकेत इतक्यात तरी नाही.”
त्यावर जयंत पाटलांनी उत्तर दिलं. “म्हणून तर प्रश्न विचारतो की, अध्यक्ष महोदय मी दहा-पंधरा दिवस या खात्याचा मंत्री होतो. मंडळाने याबाबत निर्णय घ्यावा, याचा अर्थ मंडळाने मनमानी करावा, असा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री इथे उपस्थितीत आहेत, त्यांना माझा प्रश्न आहे, डीबीटी करण्याची मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे ते साकार करण्याची अतिशय चांगली संधी आहे. त्यामुळे प्रत्येकाला अकाउंटवर पैसे द्यायची योजना ही आपण आता सुरु करावी”, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली.
भाजप प्रवेशाबद्दल प्रश्न, जयंत पाटलांनी पत्रकारांची हसत हसत घेतली फिरकी
“अध्यक्ष महोदय, मला या गोष्टीचं समाधान आहे की, अलिकडच्या काळात जयंत पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व योजना आवडायला लागल्या आहेत. मोदी साहेबांच्या योजना लागू करा, असा जयंत पाटील यांचा आग्रह मला अतिशय स्वागतार्ह वाटतो. या प्रस्तृत प्रकरणात कामगारांच्या हिताचं काय आहे ते करण्यात येईल. मंत्री महोदयांच्या अध्यक्षताखाली कमिटी तयार करुन पारदर्शक काम कसं करता येईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येईल”, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

