• Wed. Sep 9th, 2026

Nandurbar News: निर्दयी काळ! रुग्णालयात जाताना गाडीवर झाड कोसळलं, माय-लेकाचा दुर्दैवी अंत, नंदुरबार हळहळलं

Nandurbar News: निर्दयी काळ! रुग्णालयात जाताना गाडीवर झाड कोसळलं, माय-लेकाचा दुर्दैवी अंत, नंदुरबार हळहळलं

Nandurbar Mother And Son Death: आईला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना दुचाकीवर झाड कोसळलं. या अपघातात मुलगा आणि आई दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)

महेश पाटील, नंदुरबार: नंदुरबार येथे आईला वैद्यकीय उपचारासाठी दुचाकीवर घेऊन जात असताना अचानक दुचाकीवर झाड कोसळून आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना खांडबारा-नंदुरबार मार्गावर असलेल्या बालअमराई गावाजवळ घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

नवापूर तालुक्यातील वासदा गावातील दीपा दाविद गावित (वय 45) व त्यांचा मुलगा दिशांतकुमार दाविद गावित (वय 25) हे दोघे दुचाकीवरून नंदुरबार येठे वैद्यकीय उपचारासाठी निघाले होते. दरम्यान, खांडबारा-नंदुरबार मार्गावर दुपारी बालअमराईजवळ अचानक वादळी वाऱ्यांमुळे रस्त्यावर बाभळीच्या झाडाची मोठी फांदी कोसळली आणि त्यात ते दोघेही अडकले.
Pune Accident News: दुचाकी घसरली अन् ट्रेलरखाली येऊन HR चा अंत, 3 महिन्यांपूर्वी झालेलं लग्न; पुण्यातील थरारक अपघाताचा VIDEO

आईचा जागीच मृत्यू, तर मुलाने रुग्णालयात प्राण सोडले

रस्त्यावर झाड कोसळून अपघात झाल्याची माहिती कळताच प्रवासी व स्थानिक नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेला पाचारण करून स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाने तात्काळ जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघातात आई दीपा गावित यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी दिशांतकुमारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामुळे गावित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पत्नी आणि लेकाचा एकाचवेळी मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

दिशांतकुमारचे वडील साक्री पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. पत्नी आणि मुलाचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले असून, एक मुलगी सध्या कोल्हापूर येथे बीएमएस वैद्यकीय शिक्षण घेत आहे. ही घटना समजताच वासदा गावासह संपूर्ण नवापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नंदूरबारमध्ये मुसळधार पाऊस

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे झाडे कोसळण्याच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या धोकादायक झाडांची छाटणी पावसाळ्यापूर्वीच करणे आवश्यक होते, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. या निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप जीव गमावल्याची भावना सर्वत्र दिसून येत आहे.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडाआणखी वाचा