Pravin Gaikwad News : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज अक्कलकोटमध्ये शाईफेकीची घटना घडली. या हल्ल्यानंतर आज संध्याकाळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुरात प्रवीण गायकवाड यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी संभाजी ब्रिगेडकडून प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. प्रवीण गायकवाड यांना दुग्धाभिषेक करुन शुद्धीकरण करण्यात आलं.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आणि पुरोगामी संघटनांच्या तरुणांनी पंढरपुरात प्रवीण गायकवाड यांचं जंगी स्वागत केलं. प्रवीण गायकवाड यांच्यावर यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर दुग्धाभिषेक केलं. कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक करत प्रवीण गायकवाड यांचे शुद्धीकरण केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिशबाजीत प्रवीण गायकवाड यांचे स्वागत केले.
दरम्यान, प्रवीण गायकवाड यांनी शाईफेकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “मी या घटनेचा निषेध करणार नाही. पण एक निश्चित सांगतो, ही शेवटाची सुरुवात आहे. संभाजी ब्रिगेडचा इतिहास सर्वांना माहिती आहे. संभाजी ब्रिगेडची उत्तर देण्याची पद्धत सर्वांना माहिती आहे. राज्यकर्त्यांमध्ये मुख्यत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. मी कार्यक्रमात पोहोचलो त्यावेळेस कोणत्याही प्रकारची पोलीस यंत्रणा नव्हती. अशावेळेसे मला वाटते की जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा तिथे नव्हती का? काही ठरवून षडयंत्र घडलं होतं का? माझ्या जीविताला धोका होता का?”, असा सवाल प्रवीण गायकवाड यांनी केला.
“माझ्या हत्येचा कट होता. माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झाला आहे. माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संभाजी भोसले असतील, त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी जिवंत आहे. अन्यथा माझ्यावर हल्ला झाला होता. याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे”, असा घणाघात प्रवीण गायकवाड यांनी केला.
दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर निषेध व्यक्त केला आहे. “महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे भ्याड हल्ला करण्यात आला. त्यांच्या तोंडावर शाई फेकण्यात आली. हे सर्व अतिशय अस्वस्थ करणारे असून या घटनेचा निषेध करावा तितका कमीच आहे. हे निषेधार्ह कृत्य करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

