नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटजवळ असलेल्या ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग लागली. आगीमध्ये ८ ते १० ट्रक आणि टेम्पो जळून खाक झाले, तसेच प्लास्टिकच्या गोडाऊनमुळे आग अधिक भडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
लाकडी कॅरेट आणि प्लास्टिकमुळे आग क्षणात पसरली
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट नजीक तुर्भे सेक्टर २० येथे ट्रक टर्मिनल आहे. या ठिकाणी एपीएमसीला येणाऱ्या गाड्या थांबत असतात. अशा गाड्यातील माल उतरून ठेवण्यासाठी येथे एका गोडाऊनमध्ये माल ठेवण्यात येतो. याच गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा माल ठेवण्यात आला होता. या गोडाऊन मध्ये रात्री साडे आकाराच्या सुमारास आग लागल्याची वर्दी वाशी अग्निशमन दलास मिळाली होती. तुर्भे एमआयडीसी नेरूळ एमआयडीसी, कोपरखैरणे वाशी नेरूळ अशा ठिकाणच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या.लाकडी कॅरेट आणि प्लास्टिकमुळे आग क्षणात पसरली.
मोठ्या प्रमाणात मालाचे नुकसान
आगीचे लोळ इतके प्रचंड होते की काही मिनिटातच परिसरात धुराचे लोट पसरले. तेथे अग्निशमन पथक तात्काळ पोहचले होते. या दुर्घटनेत सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर मालाचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. अग्निशमन विभागाचे खबरदारी म्हणून परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले होते. आग लागण्याचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किट किंवा ज्वलनशील पदार्थांमुळे आग भडकली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

