Prataprao Jadhav : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ‘गुजरात पाकिस्तानचा भाग नाही’ असे विधान करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ वक्तव्याचे समर्थन केले. यावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका करत भाजपवर मराठी माणसांची तुलना पाकिस्तान्यांशी केल्याचा आरोप केला. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा ‘जय गुजरात’ म्हणतानाचा जुना व्हिडिओ शिंदे गटाने प्रसिद्ध केला आहे.
“शिवाजी पार्क वरून बाळासाहेब ठाकरे तमाम हिंदू बांधवांनो म्हणायचे, उद्धव ठाकरे ते विसरले. त्यांनी हिंदुत्व का सोडलं? याबाबत कोणी विचारत नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, या म्हणीप्रमाणे त्यांची अवस्था झाली”, अशी टीकाही त्यांनी केली. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
आदित्य ठाकरेंचा घणाघात
प्रतापराव जाधव यांच्या वक्तव्यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. “ते कुठल्या पक्षात आहेत? आणि त्यांच्यावर पक्ष कारवाई होणार का? दुसरं म्हणजे त्यांच्या नेत्यांनी जय गुजरात हे पुण्यात म्हटलं आहे. कुठे काय चाललं आहे. आज भाजपने मराठी माणसाची तुलना पाकड्यांबरोबर केली आहे. म्हणजे किती मराठी आणि महाराष्ट्र माणसाबद्दल भाजपच्या मनात द्वेष आहे. ते ज्या पहलगाम हल्ल्यातीस दहशतवाद्यांना पकडू शकले नाहीत त्या पाकड्यांची तुलना तुम्ही मराठी माणसाशी करतात? खरंतर तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्राचा खरा शत्रू हा भाजप आहे”, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
Pratap Jadhav | गुजरात काही पाकिस्तानचा प्रांत नाही, आपल्याच शेजारचे राज्य असल्याचं जाधव म्हणाले
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणाच्या शेवटी जय गुजरात म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. पण एकनाथ शिंदे यांनीदेखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गुजरातमधील 2019 चा व्हिडीओ दाखवला आहे. या व्हिडीओत उद्धव ठाकरे जय गुजरात म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने टीका-टीप्पणी सुरु आहे.

