Chandrashekhar Bawankule on Viral Video : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. अधिवेशन सुरु होण्याआधीचा सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत एकनाथ शिंदे यांचे हावभाव पाहता ते बावनकुळे यांच्याशी रागात बोलत असल्याची चर्चा होती. पण तसं काहीच घडलं नसल्याचा खुलासा बावनकुळे यांनी केला आहे.
विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं आहे. अधिवेशन सुरु होण्याच्या आधीच्या दिवशी प्रथेनुसार सरकारचा चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाचं विरोधकांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं. पण नेहमीप्रमाणे विरोधकांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमात केवळ महायुतीचे आमदार आणि मंत्री उपस्थित होते. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातलाच एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावेळी शिंदे यांच्या चेहऱ्यावर बोलताना राग दिसत होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. पण तसं काही नव्हतं, असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
मला काय विचारताय?, शिंदेंच्या चेहऱ्यावर त्रागा, कार्यक्रमातला बावनकुळेंसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
चंद्रशेखर बावनकुळे यांचा खुलासा काय?
“मी एकनाथ शिंदे यांना फोन केला होता की, मी तुमच्या चेंबरला येतो. तिथून आपण दोघे चहापानाला जाऊ. वाहतूक कोंडीमुळे माझी गाडी उशिरा आली. त्यामुळे ते पुढे निघून गेले होते. मी त्यांच्या चेंबरला जाऊन चहापानाच्या ठिकाणी आलो. भाऊ म्हटलं, मला उशिर झाला. तर ते म्हणाले, मी काय करु? ते तुम्ही वेगळ्या अर्थाने दाखवणार. खरंतर तेवढाच संवाद होता. त्या संवादाचा अर्थ तेवढाच होता की, मला उशिर झाला. आम्हाला दोघांना एकत्र त्या ठिकाणी यायचं होतं”, असा खुलासा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

