Raj Thackeray And Uddhav Thackeray Face to Face : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भावासाठी आज ताफा रोखला. उद्धव ठाकरे शिवतीर्थ बंगल्यावरुन जात असताना दोन्ही बंधू समोरासमोर आले. दोन्ही ठाकरे भावांचा ताफा तिथून जात होता. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा जावा यासाठी आपला ताफा रोखायला लावला. राज ठाकरे यांच्या या कृतीची सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा होत आहे. विशेष म्हणजे दोन्ही भाऊ एकाच मार्गाने एकाच वेळी समोरासमोर आलेल्या टायमिंगची देखील चर्चा होत आहे.
राज्य शासनाच्या हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आक्रमक झाले आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आक्रमक झाले आहेत. दोन्ही बंधूंचे विचार या मुद्द्यावरुन जुळत आहेत. त्यामुळे दोन्ही बंधू 5 जुलैच्या मोर्चात एकत्र दिसणार आहेत. त्याआधी उद्धव ठाकरे यांचा पक्ष आज आझाद मैदानात मराठी शिक्षण केंद्राकडून आयोजित मोर्चात सहभागी झाला. उद्धव ठाकरे स्वत: या आंदोलनात सहभागी झाले. उद्धव ठाकरे यांनी आज आझाद मैदानातीसल आंदोलनात हिंदीसक्तीच्या शासन निर्णयाची होळी केली.
आझाद मैदानावरील आंदोलन संपल्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेना भवन येथे गेले. ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शिवतीर्थ बंगल्याच्या समोरील रस्त्याने शिवसेना भवन येथे जात होते. यावेळी शिवतीर्थ बंगल्यासमोर अनोखी गोष्ट बघायला मिळाली. उद्धव ठाकरे यांचा ताफा जात असतानाच समोरुन राज ठाकरे यांचादेखील ताफा आला. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याला जाण्यासाठी आपला ताफा थांबवला. राज ठाकरे यांच्या कृतीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.
राज-उद्धव एकत्र येण्याची शक्यता?
आझाद मैदानावर आज झालेल्या आंदोलनात मनसे नेते नितीन सरदेसाई हे देखील उपस्थित होते. तसेच येत्या 5 जुलैच्या मोर्चात दोन्ही ठाकरे बंधू सहभागी होणार आहेत. या मोर्चात दोन भाऊ एकत्र आले तर मोठं शक्ती प्रदर्शन होणार आहे. यानंतर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मोठी राजकीय ताकद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही बंधू एकत्र येतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

