Lightning Strike in Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. मेहकर, लोणार, सिंदखेड राजा परिसरात शेताचे मोठे नुकसान झाले. तर लोणार तालुक्यात वडिलांसोबत गुरांना चारायला गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
शंकर खंड हा नेहमीप्रमाणे आपल्या शेतामध्ये वडिलांसोबत गुरांना चारण्यासाठी गेला होता. या दरम्यान संध्याकाळच्या वेळेस घराकडे परतत असताना ही घटना घडली. संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान ही घटना हिवराखंडमध्ये घडली. एकुलता एक मुलगा असल्याने हिवराखंड गावांमध्ये तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वडील प्रभाकर खंड हे आपल्या मुलासह शेतामध्ये गुरांना चारण्यासाठी सकाळीच नीत्तक्रमाने निघून गेले होते. दरम्यान परतीच्या संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह पाऊस अचानक सुरू झाला. पावसाला सुरुवात झाली. पावसात भिजू नये म्हणून हे सर्वजण गोठ्याकडे जात असताना शंकर खंड याच्यावर वीज कोसळली. तसेच शंकरचा मामे भाऊ ओम अंबादास लबडे (वय वर्ष 16) याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने तो या मोठ्या संकटातून बचावला. या घटनेनंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह बीबी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.
Buldhana News : पाऊस वैरी होऊन आला, घराकडे निघालेल्या ‘शंकर’वर काळाचा घाला, आख्खं गाव रडलं
अवकाळी पावसामुळे शेताचंदेखील नुकसान
काल झालेल्या या अवकाळी पावसाच्या काळामध्ये संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड सोनाळा, दानापूर, पळसोडा, वारखेड परिसरात या आपत्तीमुळे केळी आणि संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले. केळीच्या बागा आडव्या झाल्या असून काही झाडे मुळासकट पडली. शेतातील गुरांसाठी साठवलेला मक्का, भुईमूग, कुटार पावसामुळे भिजून वाया गेला आहे.
