• Tue. Jun 30th, 2026
    Siya Goyal : केतनने खूप जीव लावला, आदर दिला, मुलासारखाच होता; सिया गोयलच्या पालकांनी पहिल्यांदाच सोडले मौन, लेकीच्या कृत्यावर म्हणाले…

    Sia Goyal Parents Reaction : केतन अगरवाल मृत्यूप्रकरणामध्ये आता आरोपी सिया गोयलच्या आई-वडिलांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. केतन हा अतिशय सुसंस्कृत मुलगा होता, असे सांगत त्यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केल्याचे समोर आले आहे. सियाच्या आई वडिलांनी नेमकं काय म्हटलं आहे?

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : उद्योगपती केतन अगरवाल मृत्यू प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. सुरुवातीला अपघाती मृत्यू मानल्या गेलेल्या या प्रकरणात आता हत्या झाल्याचा दावा पोलिस तपासातून समोर आला आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी कट रचल्याचा आरोप असून, या प्रकरणावर सिया गोयलच्या आई-वडिलांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. “केतन आमच्यासाठी मुलासारखाच होता. तो आमच्या मुलांपेक्षाही अधिक आदर देत होता. त्याने आमच्या संपूर्ण कुटुंबावर भरभरून प्रेम केले. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी भावना सियाच्या आईने व्यक्त केली.

    सियाची आई नेमकं काय म्हणाली?

    “माझा मुलगा साहिलपेक्षाही जास्त जीव केतनने लावला. त्यामुळे माझा जीव तुटतो आहे. त्याच्यासोबत ज्याने कोणी हे कृत्य केले आहे. त्यांना शिक्षा मिळालीच पाहीजे. देवाला माहिती आहे, त्याच्यासोबत असं कृत्य कोणी केलं आहे? जर सियानेही असं काही केलं असेल तर तिलाही शिक्षा मिळावी”, असं सियाची आई पूजा गोयल यांनी न्यूज डॉट्जशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

    उदयपूरमधील लग्नाच्या तयारीबाबत काय म्हणाले?

    केतन आणि सिया यांच्या विवाहाची तयारी जोरात सुरू असल्याचे सांगितले जात होते. उदयपूरमध्ये भव्य सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. आलिशान व्हिला, पाहुण्यांची यादी आणि चार्टर विमानांची व्यवस्था अशा चर्चांनाही उधाण आले होते. मात्र, लग्नासाठी दोन चार्टर विमाने बुक करण्यात आल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचे सियाच्या वडिलांनी स्पष्ट केले. अशा प्रकारची माहिती फेक असल्याचा दावा त्यांनी केला.

    तपासात गंभीर आरोप समोर आले

    अगरवाल कुटुंबात लग्नाच्या तयारीला वेग आला असतानाच, सिया गोयल आणि चेतन चौधरीने मिळून केतन अगरवालची हत्या केल्याचा आरोप तपासात पुढे आला आहे. प्रेमसंबंधांमधील अडथळा दूर करण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात सिया आणि चेतन या दोघांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    लग्नाऐवजी जीवे मारण्याचा मार्ग का निवडला?

    पोलिस चौकशीत आणखी काही महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. तपासानुसार, 14 जून रोजीही सियाने केतन यांना लोहगड किल्ल्यावर नेले होते. मात्र, त्या वेळी कट अंमलात आणण्यात यश आले नाही. त्यानंतर 19 जूनला कुटुंबीयांसोबत सियाचा वाढदिवस साजरा होणार होता. मात्र, त्याआधी 18 जून रोजी ट्रेकिंगसाठी लोहगडला जाण्याचा आग्रह सियाने धरल्याचे सांगितले जाते.

    पोलिसांच्या माहितीनुसार, नियोजनाप्रमाणे चेतन चौधरी आधीच लोहगड परिसरात पोहोचला होता. ट्रेकदरम्यान केतन पुढे असताना, चेतन मागून आला आणि त्यानंतर दोघांनी मिळून केतनला खोल दरीत ढकलल्याचा आरोप आहे. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण कटामागील कारणे, नियोजन आणि इतर पुराव्यांचा सखोल तपास सुरू आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा