Pune Attack News: पुण्यात कोयता गँगची दहशत वाढत असून दत्तवाडी परिसरात एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सात ते आठ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी तरुणावर वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील दत्तवाडी परिसरातील एका रस्त्यावर भररस्त्यात सात ते आठ जणांचे टोळके एका तरुणाच्या मागे कोयता आणि इतर धारदार हत्यारे घेऊन धावत होते. टोळक्यापासून वाचण्यासाठी सदर तरुण जीवाच्या आकांताने धावत होता. मात्र रस्त्यावर वळणावर त्याचा तोल गेला आणि तो काही क्षणांसाठी खाली कोसळला. तितक्यात पाठीमागून हातात कोयता घेऊन आलेल्या एकाने त्याच्यावर वार केला. त्यापाठोपाठ टोळीतील इतर तरुणही आले आणि त्यांनीही त्या तरुणावर कोयत्याने हल्ला केला. हा सगळा प्रकार तिथं असणाऱ्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पुण्यात धक्कादायक घटना; भररस्त्यात तरुणावर कोयत्याने वार pic.twitter.com/97LWTLrrND
— Maharashtra Times (@mataonline) May 15, 2025
या भयंकर हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील एका रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून डॉक्टरांकडून त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.
दरम्यान, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती असून दत्तवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. तसंच पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचे शोध घेतला जात आहे.

