CM Devendra Fadnavis Speech : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या महायुती सरकारबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपल्या नावावर सर्वात कमी कार्यकाळ मुख्यमंत्री असल्याचा रेकॉर्ड नोंद झाला आहे. पण त्याच काळात सध्याच्या महायुती सरकारची मुहूर्तमेढ रोवली गेली होती, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“मगाशी मी माझी फिल्म बघत होतो. लोकांना वाटतं की, मी दोन वेळा मुख्यमंत्री झालो. पण मी तीनवेळा मुख्यमंत्री झालो, एकदा 72 तासांचा मी मुख्यमंत्री होतो. अजित पवार यांच्या नावावर सर्वात जास्त वेळेचा उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड आणि सर्वात कमी वेळेसाठी उपमुख्यमंत्री होण्याचा देखील रेकॉर्ड आहे. माझ्याही नावे सर्वात कमी वेळेचा मुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड आहे. कारण आम्ही दोघेही 72 तास त्यावेळी राज्य चालवलं. पण आज जे सरकार दिसतंय, ज्याप्रकारची युती आज तुम्हाला दिसतेय त्याची मुहूर्तमेढ आम्ही त्या 72 तासांमध्येच रोवली होती”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीसांचा ठाकरेंना टोला
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील टोला लगावला. “सगळेच माजी मुख्यमंत्री आले असते तर आनंद झाला असता. कारण हा मंच तसा राजकीय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जरी या कार्यक्रमाचं आयोजन केलं तरी हा गौरवशाली महाराष्ट्राच्या महोत्सावाचा मंच असल्यामुळे, मला असं वाटतं की, गौरवशाली महाराष्ट्राचा ज्यांना अभिमान आहे अशा सगळ्यांनी इथे येऊन सत्कार घेतला असता तर ते अधिक औचित्यपूर्ण झालं असतं. पण काही हरकत नाही. जे आले त्यांचा सत्कार आहे. जे नाही आले त्यांचा मनातून सत्कार आहे”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस आणखी काय म्हणाले?
“संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेकांचं योगदान आहे. त्याबाबत युवा पिढीला कदाचित माहिती नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या कार्यक्रमातून त्या लढ्याचं योगदान तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम सुरु केला आहे. इथलं प्रदर्शन झाल्यानंतर आपण मंत्रालयात खाली असणाऱ्या दालनात आयोजित केला पाहिजे, अशी मी विनंती करतो. कारण तिथे मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. त्यांना हा इतिहास त्या ठिकाणी पाहता येईल. त्यातून त्यांना मोठी प्रेरणा मिळेल. या उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार या कार्यक्रमाचं चांगलं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं. आम्हाला निमंत्रित केलं. आपण सिंहावलोकन केलं, तर या महाराष्ट्रात एवढे नेते आहेत, सर्वांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत काहीना काही मोलाचं काम केलं आहे. त्यामुळे अशा नेत्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे”, असंदेखील देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले.

