Thane Crime : ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने उत्तर प्रदेशात एमडी बनवण्याच्या कारखान्यावर धाड टाकून, मोठी कारवाई केली. पोलिसांनी कारखान्यातून सव्वादोन कोटींपेक्षा जास्त किमतीचे एमडी आणि ते बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका उच्चशिक्षित आरोपीसह तिघांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
मुंब्रा परिसरात एकाला अटक –
मुंब्रा परिसरात एक व्यक्ती एमडीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल म्हस्के यांच्या पथकाने मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळील दत्तुवाडी येथून देवेश कुमार रामकिशन शर्मा (३२) याला अटक केली. त्याच्याकडून ६७ लाख २० हजारांचा ३३६ ग्रॅम एमडी जप्त केले. या प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उत्तरप्रदेशचा असलेल्या शर्माकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये त्याला हे एमडी उत्तरप्रदेशच्या अयोध्या जिल्ह्यातील सोहावल येथे राहणारा मोहम्मद कय्युम मोहम्मद युनुस हाशमी याने दिल्याचे बाब पुढे आली. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक अयोध्याला रवाना झाले. त्याठिकाणी गेलेल्या पोलिसांना हाशमी याचे सोहावलमध्ये कपडे विक्रीचे दुकान असल्याची माहिती मिळाली.
Raigad News : आनंदाचा क्षण दु:खात बुडाला, घाटकोपरमधील तरुणासोबत कर्जतमध्ये अनर्थ घडला, कुटुंबावर शोककळा
कपड्याच्या दुकानाच्या मागे ड्रग्सचा कारखाना –
एमडी तस्करीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिस पाच दिवस सोहावलमध्ये वेषांतर करुन राहिले. कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने पोलिस अधिकारी त्या दुकानात गेले होते. या संपूर्ण तपासामध्ये दुकानाच्या पाठीमागील गाळ्यामध्ये एमडी बनवण्याचा कारखाना उघडून त्याठिकाणी एमडीची निर्मिती केली जात असल्याचे पोलिसांना समजले.
Thane News : मित्रांसोबत रविवारी तलावात गेला, काही कळायच्या आत अनर्थ घडला; ठाण्यात तरुणासोबत दुर्दैवी घटना
या माहितीनंतर आणखीन एक पथक उत्तरप्रदेशला गेले. स्थानिक पोलिसांची मदत घेत या पथकांनी कारखान्यावर छापा टाकत हाशमी याच्यासह, बिपीन पटेल (४९) यांना अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. हा कारखाना सील केला असून कारखान्यामधून १ कोटी ६२ लाख ४० हजार रुपयांचे ८१२ ग्रॅम एमडी आणि एमडी बनवण्यासाठी आवश्यक साहित्य, केमिकल जप्त केल्याचे त्यांनी सांगितले. अशाप्रकारे २ कोटी २९ लाख ६० हजार रुपये किंमतीचे १ किलो १४८ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. शर्मा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असून हाशमी, पटेल यांना न्यायालयाने ३ मे पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. अन्य फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.
Thane News : उत्तरप्रदेशातून मुंब्रापर्यंत कनेक्शन, कारखान्यात छापा अन् कपडे विक्रीच्या दुकानामागे… ठाणे पोलिसांची मोठी कारवाई
पटेल याला एमडी बनवण्याची माहिती –
मुळचा गुजरातमधील अहमदाबादचा असलेला बिपीन पटेल याचे शिक्षण एमएसस्सी (केमिस्ट्री) पर्यंत झाले असून पूर्वी तो केमिकल कंपनीमध्ये काम करत होता. त्यामुळे त्याला एमडी कसे बनवायचे माहिती होते. आणि तो एमडी बनवत असल्याचे पोलिस उपायुक्त जाधव यांनी सांगितले. या प्रकरणात तोच मुख्य आरोप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याच्याविरुद्ध मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये अमली पदार्थ संबधित दोन गुन्हे दाखल असून यातील एका डीआरआयच्या गुन्ह्यात तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर हाशमी याच्याविरुद्ध मिरा-भाईंदर, उत्तरप्रदेशमध्ये एनडीपीएस कायद्यातंर्गत गुन्हे दाखल आहेत.

