• Sun. Jun 14th, 2026

    भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 13, 2026
    भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    पुणे, दि. १३ :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसेच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सुरू असलेल्या मंदिर परिसर विकास आणि हेरिटेज वाडी प्रकल्पाची पाहणी केली. कामाची गती व गुणवत्तेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. पुढील वर्षी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी या प्रकल्पातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

    यावेळी आमदार दिलीप वळसे- पाटील, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    कमी कालावधीत उत्कृष्ट दर्जाचे काम केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला देशभरात मोठी मान्यता असून या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पात मूळ मंदिराचा सभामंडप, त्याचा जीर्णोद्धार आणि परिसर विकासाची कामे अतिशय वेगाने सुरू आहेत. मंदिर परिसर विकासाच्या माध्यमातून भीमाशंकरचे संपूर्ण रूप पालटणार आहे. यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

    हेरिटेज वाडी प्रकल्पाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, सुमारे दीडशे घरे नव्या ठिकाणी स्थलांतरित होत असून या नागरिकांसाठी शेजारीच आधुनिक सुविधांनी युक्त नवीन गाव उभारण्यात येत आहे. हे गाव केवळ पुनर्वसनापुरते मर्यादित राहणार नसून तेथील अर्थव्यवस्थेलाही नवी दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

    परिसरातील वाहतूक व्यवस्थेबाबतही महत्त्वपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. जाण्यासाठी आणि येण्यासाठी स्वतंत्र रस्ते तयार केले जात असून त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. दुकाने, बसस्थानक आणि इतर सार्वजनिक सुविधा सुव्यवस्थित पद्धतीने विकसित केल्या जात असून भाविक आणि स्थानिक व्यावसायिक या दोघांच्याही हिताचा विचार करण्यात आल्याचे श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

    या सर्व विकासकामांमुळे भविष्यात भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या पाच ते दहापट वाढेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed