• Sat. Mar 7th, 2026

    Navneet Rana : ‘नाहीतर मी तिथे येऊन धिंगाणा करेन’, नवनीत राणा यांचा जिल्हा शल्य चिकित्सकांना दम, कारण काय?

    Navneet Rana : ‘नाहीतर मी तिथे येऊन धिंगाणा करेन’, नवनीत राणा यांचा जिल्हा शल्य चिकित्सकांना दम, कारण काय?

    Navneet Rana Angry : माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छता आणि बंद असलेल्या सिटीस्कॅन सुविधेवरुन जिल्हा शल्य चिकित्सकांना धारेवर धरले. रुग्णालयात स्वच्छता न झाल्यास तिथे धिंगाणा करेन, असा दम त्यांनी दिला. रुग्णांना गैरसोय टाळण्यासाठी तातडीने या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली, अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा इशाराही दिला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    अमरावती : माजी खासदार नवनीत राणा या अमरावती जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेवरुन आक्रमक झालेल्या बघायला मिळाल्या. नवनीत राणा यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन लावून चांगलंच धारेवर धरलं. जिल्हा रुग्णालयात स्वच्छता करा. नाहीतर मी तिथे येऊन धिंगाणा करेन, असा दम नवनीत राणा यांनी दिला. यावेळी नवनीत राणा यांनी जिल्हा रुग्णालयात सीटीस्कॅनदेखील बंद असल्याची तक्रार अधिकाऱ्यांकडे केली. स्वच्छतेचा प्रश्न आणि सिटीस्कॅनचा मुद्दा यावर ताबोडतोब तोडगा काढावा, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली.

    “खूप धिंगाणा होऊन जाईल. कारण मी आज फोटो बघितले. तिकडचे वॉशरुम इतके अस्वच्छ आहेत की कोणताही गरीब पेशंट किंवा कुणीही तिकडे जाऊ शकत नाही. स्वच्छतेचं कंत्राट ज्यांनी घेतलं आहे ते काय करत आहेत? मी काय करु, मला समजतच नाही. सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात कंत्राटाचे पैसे देते आणि एकही माणूस तिथे जाऊ शकत नाही. एवढ्या उन्हात ते कुठे जातील?”, असा सवाल नवनीत राणा यांनी केला.

    ‘…तर धिंगाणा करुन टाकेन’

    “मी आता तिथे आली तर धिंगाणा करुन टाकेन. कंत्राटदार कोण आहे? रेग्यूल साफसफाई करणारे कोण आहेत? आज जर साफसफाई झाली नाही, मला रेग्युलर साफसफाई करणाऱ्यांचे संध्याकाळी फोटो पाहिजेत. सीरियस पेशंटचे तिथे सिटीस्कॅन होत नाही? कुठे चालू आहे? आमचे तिथे चार-चार लोकं हॉस्पिटलचे कामं करणारे आहेत. चार-चार लोकं मला आपल्या एका पेशंटचं अर्जंट सिटीस्कॅन करायचं आहे, असं सांगतात तर सिटीस्कॅन होत नाही. अरे कालपासून एक पेशंट दाखल आहे. त्याचा सिटीस्कॅन होत नाहीय. का होत नाही म्हणून त्यांना विचारा”, अशा शब्दांत नवनीत राणा यांनी सुनावलं.

    नवनीत राणा यांचा अमरावती जिल्हा शल्य चिकित्सकांना दम देताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवनीत राणा यांनी स्वत: आपल्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. नवनीत राणा या व्हिडीओत अधिकाऱ्याला धारेवर धरताना दिसत आहेत. यावेळी त्यांना काही कार्यकर्ते तक्रारदेखील करताना दिसत आहेत. त्यांच्या तक्रारीची दखल घेत नवनीत राणा या संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारताना दिसत आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed