Jammu and Kashmir News : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या तपासात सुरक्षा यंत्रणांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. हल्ल्यातील दोन संशयित दहशतवादी पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. महाराष्ट्रातील मावळचे श्रीजीत रमेश यांच्या मुलीचा व्हिडीओ काढताना हे दहशतवादी कॅमेऱ्यात कैद झाले. NIA या घटनेचा अधिक तपास करत आहे. दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी परिसराची रेकी केल्याचा संशय आहे.
मावळचे पर्यटक श्रीजीत रमेश हे जम्मू-काश्मीर फिरायला गेले होते. ते 18 एप्रिलला पहलगामच्या बेताब व्हॅली येथे गेले होते. तिथे ते आपल्या मुलीचा रीलसाठी व्हिडीओ बनवत होते. याचवेळी त्यांच्या पाठीमागून दोन इसम हे जाताना दिसले. यापैकी एक इसमने झब्बा घातलेला होता. तर दुसरा इसम हा टी-शर्ट आणि नाईट पँटवर होता. त्यांचा एकमेकांशी बोलतानाचा आणि हसतानाचा स्पष्ट फोटो श्रीजीत यांच्या मोबाईलमध्ये कैद झाले आहेत. संबंधित संशियत दहशतवादी हे तेच असतील तर एनआयएकडे हा मोठा पुरावा असणार आहे.
पहलगाममध्ये बैसरन व्हॅलीत 22 एप्रिलला हल्ल्याची घटना घडली. तर संशियत दहशतवादी हे बैताब व्हॅलीत एका व्हिडीओत कैद झाले आहेत. बेताब व्हॅली ते बैसरन व्हॅली दरम्यान पाच ते साडेपाच किमीचं अंतर आहे. त्यामुळे दहशतवाद्यांकडून रेकी करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. दहशतवाद्यांनी दोन-दोन जणांचे गट बनून परिसरात रेकी केल्याचं आता उघड झालं आहे.
पर्यटक श्रीजीत रमेश काय म्हणाले?
“श्रीजीत रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी माझ्या सहा वर्षाच्या मुलीचा रिल्ससाठी एक व्हिडीओ शूट करत होतो. तो व्हिडीओ शूट केल्यानंतर आम्ही परत काश्मीरमधील काही परिसर फिरुन पुण्याला परत आलो. पुण्यात आल्यानंतर आम्ही जेव्हा ऐकलं की, 22 तारखेला हल्ला झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी 4 दहशतवाद्यांचा फोटो जारी केला. त्यापैकी 2 दहशतवाद्यांचा चेहरे पाहिल्यावर आम्हाला वाटलं की, आम्ही त्याला कुठेतरी पाहिलं आहे. यानंतर मी माझ्या पत्नीला विचारल्यानंतर तिनेही या व्यक्तींना आम्ही कुठेतरी पाहिलं असल्याचं म्हटलं. त्यामुळे आम्ही पहलगामचे जेवढे व्हिडीओ काढले होते ते चेक केले. यावेळी मुलीच्या रिल्सच्या व्हिडीओत दोन दहशतवादी जाताना दिसत आहेत. त्यांचे हावभाव पाहिल्यानंतर 18 तारखेला ते तिथल्या परिसराचा अभ्यास किंवा रेकी करण्यासाठी आले होते, असं आम्हाला शंभर टक्के वाटतं”, अशी प्रतिक्रिया श्रीजीत रमेश यांनी दिली.

