• Thu. Sep 10th, 2026

नंदुरबार जिल्ह्यातील पाणीटंचाई, पीक परिस्थिती व गणेशोत्सव नियोजनाचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आढावा – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 10, 2026

नंदुरबार, दि.१० सप्टेंबर: जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला असून, उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करून ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राहील, या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज सकाळी आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 47 टक्के पाऊस झाला असून, गतवर्षी याच कालावधीत सुमारे 75 टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे उपलब्ध धरणांमधील पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याचा प्राधान्याने पिण्यासाठी वापर होईल, याची दक्षता घ्यावी. सध्या जिल्ह्यात एकही टँकर सुरू नसला तरी भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी आवश्यक पूर्वनियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिले.

पीक परिस्थितीचा आढावा घेताना परतीचा पाऊस चांगला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा विचार करून कृषी विभागाने सज्ज राहावे. पीक विमा योजनेत जिल्ह्यात 62 हजार 794 शेतकरी सहभागी झाले असून, पीक नुकसानीचे पंचनामे व पीक कापणी प्रयोग नियमानुसार व तातडीने पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले. ऑक्टोबरपासून पीक कापणी प्रयोग सुरू होतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पाणी उपलब्धता आणि विविध उपाययोजनांचा आढावा बैठकीत सादर केला. पीक विम्याबाबत संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्यात येत असून, पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार भरपाई मिळण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कुपोषण निर्मूलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, ग्रामीण भागातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed