Pahalgam Terror Attack BJP and Shivsena Credit War : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. यामध्ये मात्र सत्ताधारी महायुतीतील दोन्ही पक्षांचे वेगवेगळे दावे पाहता पर्यटकांना परत आणण्यावरुन श्रेयवाद सुरु झाल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अधिकृत एक्स हँडलवर माहिती देण्यात आली की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने आयोजित केलेल्या विशेष विमानांची व्यवस्था केली जात आहे. आतापर्यंत ५०० पर्यटकांना राज्यात परत आणण्यात आले आहे. शिवसेना मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याचे श्रेय देत आहे. शिवसेनेच्या नेत्याचे म्हणणे आहे की, ५२० पर्यटकांच्या विमानाचा खर्च शिवसेनेने उचलला आहे. खुद्द एकनाथ शिंदेंनी या मदतकार्यात लक्ष घातले आहे. श्रीनगरहून ५२० प्रवाशांना परत आणले आहे.
यातच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयीन निवेदनात नमूद करण्यात आले की, शुक्रवारी २३७ पर्यटकांची आणखी एक तुकडी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. फडणवीस यांनी गुरुवारी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. उर्वरित पर्यटकांना परत आणण्यासाठी अधिक विमानांची आवश्यकता भासल्यास राज्य सरकार खर्च उचलणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकारने काश्मीरमधील पर्यटकांना परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले होते. खु्द्द मुख्यमंत्री यांनी यात लक्ष घातले आणि स्थानिक प्रशासनाशी देखील संपर्क साधला, असे म्हटले जाते. त्यानंतर बुधवारी फडणवीस यांनी काश्मीर स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आहे.
हल्ल्यानंतर पर्यटकांना परत आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र प्रयत्न केले जात आहेत, असे चित्र आहे. सरकारने बुधवारी जाहीर केले की, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह राज्यात आणले गेले तेव्हा कॅबिनेट मंत्री आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा मुंबई विमानतळावर समन्वयासाठी होते. तर पुण्यातील जबाबदारी माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
दुसरीकडे शिवसेनेने आपले मंत्री गुलाबराव पाटील आणि योगेश कदम यांना मुंबई विमानतळावर तैनात केले होते. पर्यंटकांना परत आणण्याच्या समन्वयासाठी शिंदे स्वतः बुधवारी श्रीनगरला रवाना झाले आणि त्यांनी दोन दिवस तिथेच तळ ठोकला होता.
दोन्ही पक्षांच्या या स्वतंत्र व्यवस्थेवर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी सांगितले की, सत्ताधारी आघाडीतील लोक स्वतःचा प्रचार करत आहेत आणि पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्यासारख्या घटनांनाही ते सोडत नाहीत.

