Pahalgam Terror Attack Updates : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यावेळी नेमकं काय घडलं याबाबत लेले, मोने आणि जोशी यांच्या कुटुंबियांनी आज एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का मोने यांनी यावेळी आपल्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेची सविस्तर माहिती दिली.
“आम्ही तिथे एक-दीड वाजेच्या सुमारास पोहोचलो. तिथे भरपूर गर्दी होती. सर्वजण खूप खूश होते. सगळे आनंदी होते. सर्वांचं फोटोसेशन काढणं सुरु होतं. थोडसं ऊन होतं म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठीआणि थोडं काही खाण्यासाठी स्टॉलवर गेलो. तिकडे आमचं खाऊन झालं आणि आम्हाला थोडासा गोळीबाराचा आवाज आला. आम्हाला वाटलं पर्यटनस्थळ आहे त्यामुळे इथे गेम्स वगैरे असतील म्हणून लक्ष दिलं नाही. पण अचानक गोळीबार सुरु झाल्याने मोठा गोंधळ उडाला. सगळेच घाबरले”, असं अनुष्का मोने यांनी सांगितलं.
‘माझे मिस्टर बोलले गोळ्या घालू नका अन्य…’
“आम्ही सर्वजण खाली झोपलो. मग नंतर ते आम्हाला विचारायला लागली की, हिंदू कोण आणि मुस्लीम कोण आहे? त्यांना कुणीही रिप्लाय दिला नाही. कुणीच वेगळे झाले नाही. आमच्यातले एकजण तुम्ही असं का करताय? बोलायला गेले तर त्यांच्यावर गोळीबार केला. माझे मिस्टर बोलले की, गोळ्या घालू नका. आम्ही काही करत नाहीत. आम्ही इथे बसतो. तर त्यांनाही गोळ्या घातल्या. परत त्यांनी विचारलं की, हिंदू कोण आहे म्हणून तर आमच्या जिजूंनी हात वरती केला. तर त्यांच्यावरही गोळीबार केला”, अशी आपबीती अनुष्का मोने यांनी सांगितली.
‘दहशतवादी गेल्यानंतर आम्ही त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण…’
“आमच्यासमोर आमच्या तीनही कुटुंबावर त्यांनी गोळ्या झाडल्या. आमच्या घरातील ते कर्ते पुरुष होते. असं बऱ्याच जणांना त्यांनी मारलं. आम्ही काहीच करु शकलो नाहीत. ती लोकं नंतर गेल्यानंतर आम्ही त्यांना हलवण्याचा, उठवण्याचा खूप प्रयत्न केला. पण आम्हाला काहीच करता आलं नाही. तिथली लोकं बोलायला लागली की, तुम्ही तुमचा जीव वाचवून तिकडून निघून जा. त्याच दरम्यान ते आतंकवादी बोलत होते की, आप लोगों ने यहाँ पें आतंक मचा के रखां हैं. पर्यटक फक्त फिरायला येतात त्यांनी काय आतंक केलंय तिथे ते समजलं नाही. त्यामुळे सरकारने यावर कारवाई करावी. आम्हाला न्याय मिळून द्यायला हवा”, अशी मागणी अनुष्का मोने यांनी केली.

