Nanded Farmer Kartule Chiku and Melon Farming : नांदेडमध्ये एका शेतकऱ्याने चिकू आणि खरबूज या फळबागेतून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. व्यवसायातील मोठ्या तोट्यानंतर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा फळबाग लागवडीचा निर्णय यशस्वी झाला.
१९ लाखांच्या नुकसानीनंतर फळबाग फुलवण्याचा निर्णय
संतोष देशमुख हे अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव येथील रहिवासी आहेत. त्यांची सहा एकर शेती आहे. सुरुवातीला देशमुख हे कापूस विक्रीचा व्यवसाय करायचे, मात्र त्या व्यवसायात त्यांना १९ लाख रुपयाचं नुकसान सोसावं लागलं. त्यानंतर त्यांनी शेतात फळबाग फुलवण्याचा निर्णय घेतला.
Farmer Success Story: नांदेडच्या शेतकऱ्याचा पावसाळी रानभाजी कर्टुले लागवडीचा यशस्वी प्रयोग, चार महिन्यात लाखोंचं उत्पन्न
एक एकरात फुलवली चिकूची बाग
कापूस विक्रीच्या व्यवसायात १९ लाखांचं नुकसान झाल्यानंतर संतोष यांनी एक एकरात चिकू फळाची बाग फुलवली. २००३ साली संतोष देशमुख यांनी सिंधुदुर्ग येथून २२० रुपये प्रति प्रमाणे चिकूची ४० रोपं खरेदी केली होती. त्यांच्या बागेत दरवर्षी ४० क्विंटल चिकू उत्पादन होत आहे. बाजारात ३० रुपये प्रति किलो प्रमाणे त्यांना २ लाख ४० हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. विशेष म्हणजे एकदा केलेल्या लागवडीनंतर त्यांना आता या फळबागेसाठी एक रुपया देखील खर्च लागत नाही.
Nanded News : व्यवसायात नुकसान, नंतर शेतकऱ्याने धरली शेतीची कास; चिकू आणि खरबूज फळबागेतून लाखोंचं उत्पन्न
खरबूजच्या लागवडीतून लाखो रुपयाचं उत्पन्न
संतोष देशमुख हे चिकूच्या फळबागेसह दरवर्षी आपल्या चार एकरमध्ये खरबूजची लागवड करतात. यातून त्यांना चांगलं उत्पन्न देखील मिळतं. खरबूज लागवडीसाठी त्यांना ४ लाख १० हजार इतका खर्च येतो, तर त्यातून वर्षकाठी त्यांना ११ लाख ६० हजार रुपयाचं उत्पन्न मिळतं आहे. फळांना बाजारात नेहमी मागणी असते, त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबागेचा प्रयोग करावा आणि लाखोचं उत्पन्न मिळवावं, असा सल्ला युवा शेतकरी संतोष देशमुख यांनी दिला आहे.

