Eknath Shinde News : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण दोन्ही बाजूंकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकाराने प्रश्न विचारला असता ते पत्रकारावर चांगलेच संतापलेले बघायला मिळाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही नेते एकत्र आले तर आपल्याला आनंदच होईल. वाट बघा. एकत्र आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करु, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रचंड आनंद व्यक्त केला आहे. ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांमध्ये सध्या अटींवरुन शाब्दिक चकमक सुरु आहे. तरीही ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या सकारात्मक दिसत आहेत. यामुळे कदाचित आगामी काळात ठाकरे बंधूंमध्ये दिलजमाई होऊ शकते.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या वृत्तावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “दोन्ही बंधू एकत्र येत असतील तर त्याच कुणाच्या पोटात दुखायचं कारण नाही. दोन्ही पक्ष आपापले निर्णय घेतील. त्यात तिसऱ्या पक्षाने प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. त्यांना योग्य वाटत असेल तो निर्णय त्यांनी घ्यावा”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
Raj-Uddhav Thackeray एकत्र आले तर दोघांना किती फायदा होणार? सोप्या शब्दांत समजून घ्या A टू Z ‘राजकारण’
एकनाथ शिंदे पत्रकारावर भडकले
दुसरीकडे महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टीव्ही 9 मराठीच्या पत्रकाराने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे त्याच्यावर चांगलेच भडकले. “अरे जाऊदे यार. काय तू कामाचं बोल यार”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी यावेळी संताप व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांच्या या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

