• Sat. Jun 6th, 2026
    अशी अभद्र युती…; राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाची भावना; चर्चा झडत असताना ईश्वर चरणी प्रार्थना

    Uddhav Thackeray And Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंना दणका बसला आणि ठाकरे ब्रँडच धोक्यात आला. यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं, वाद क्षुल्लक असल्याचं म्हणत टाळीसाठी हात पुढे केला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंना दणका बसला आणि ठाकरे ब्रँडच धोक्यात आला. यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं, वाद क्षुल्लक असल्याचं म्हणत टाळीसाठी हात पुढे केला आहे. तर मी सोबत येण्यास तयार आहे. माझ्याकडून सगळी भांडणं मिटली, अशा शब्दांत उद्धव यांनीदेखील भावाला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वाढली असून तशा चर्चाही झडू लागल्या आहेत.

    दोन्ही ठाकरे बंधूंची सकारात्मक विधानं समोर आल्यानंतर शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी संभाव्य युतीबद्दल भाष्य केलं. ‘माझी आत्ताच उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. मी त्यांच्याशी याबद्दल सविस्तर बोललो आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसावर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल. पण आम्ही वाट पाहू’, असं राऊत म्हणाले.Uddhav Thackeray And Raj Thackeray: ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा; उद्धवसेनेकडून दोन भावांचा खास फोटो पोस्ट, युती होणार?
    दुसरीकडे राज यांच्या मनसेचे नेते मात्र उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत युती करण्याच्या विरोधात आहेत. त्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यातून त्यांचा विरोध अतिशय स्पष्टपणे समोर येत आहे. उद्धव ठाकरेंनी २०१४ आणि २०१७ राज यांच्यासोबत विश्वासघात केला. मग आता त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा थेट सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला. देशपांडे मुंबई मनसेचे अध्यक्ष आहेत.

    आमची जीभ आधीच पोळली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न आहे, असं देशपांडे म्हणाले. ‘राज ठाकरेंनी भाजप, शिंदेसेनेच्या नेत्यांना भेटू नये, त्यांचा पाहुणाचार करु नये अशी अपेक्षा उद्धव ठाकरे व्यक्त करतात. तशा अटी राज ठाकरेंसमोर ठेवतात. मग यांच्या भेटीगाठी कशा चालतात? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटतात. चंद्रकांत पाटील यांची भेट घेतात. त्यांच्याकडून चॉकलेट घेतात. हे सगळं कसं चालतं?’ असे सवाल देशपांडेनी विचारले.


    यानंतर आता मनसेच्या चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. खोपकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. ती केवळ एका वाक्याची आहे. ‘अशी अभद्र युती होऊ नयेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज यांच्या जवळच्या शिलेदारांचा उद्धव ठाकरेंच्या पक्षाशी युती करण्याला ठाम विरोध असल्याचं स्पष्ट होत आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed