• Sun. Mar 15th, 2026

    Supriya Sule : ‘बाळासाहेब ठाकरे हा दिवस बघण्यासाठी असते तर…’, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

    Supriya Sule : ‘बाळासाहेब ठाकरे हा दिवस बघण्यासाठी असते तर…’, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

    Raj Thackeray and Uddhav Thackeray : “आज दोघे भाऊ एकत्र येत आहेत. मला असं वाटतं, आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे कुटुंबातील दोघे भाऊ एकत्र येत असतील मला असं वाटतं की, हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक राजकीय आणि कौटुंबिक सुवर्ण दिवस आमच्या सगळ्यांसाठी असेल”, अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही नेत्यांकडून तशी वक्तव्ये करण्यात आली आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात याचबाबत चर्चा सुरु आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या वृत्तावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आनंद व्यक्त केला आहे. “राज ठाकरे म्हणाले की, आमच्यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे ही त्यांची लाईन आहे. माझ्यासाठी ही अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    “योगायोगाने ती बातमी बघितल्यानंतर मी दोघांनाही संपर्क साधला. माझ्या अंगावर आज काटा आला. ही इतकी आनंदी आणि समाधानी गोष्ट होती. आमचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पाच ते सहा दशकांचे कौटुंबिक संबंध आहेत. आमच्या पवार कुटुंबाला उद्धव आणि राज दोन्ही भाऊ तेवढेच प्रिय आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    ‘हा महाराष्ट्राच्या इतिहासातला…’

    “आज दोघे भाऊ एकत्र येत आहेत. मला असं वाटतं, आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे कुटुंबातील दोघे भाऊ एकत्र येत असतील मला असं वाटतं की, हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक राजकीय आणि कौटुंबिक सुवर्ण दिवस आमच्या सगळ्यांसाठी असेल”, अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

    “दोन्ही पक्षांचे प्रवक्ते बोलत आहेत. दोने भाऊ बोलत नाहीयत. दोघांमध्ये गैरसमज निर्माण करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या हितासाठी दोन बंधू एकत्र येत असतील तर मला असं वाटतं आपण सर्वांनी प्रेमाने स्वागत करायला हवं. दोघांच्या वक्तव्याचं मी स्वागत करते”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

    ‘दोन्ही बाजूने नाती जपली जात असतील तर…’

    यावेळी सुप्रिया सुळे यांना पवार कुटुंबातही मनोमिलन होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ‘पांडुरंगाची इच्छा’ अशी प्रतिक्रिया दिली. “माझ्यासाठी नातेसंबंध कालही, आजही आणि उद्याही महत्त्वाची आहेत. नाते जोडण्यासाठी कुणी प्रामाणिक प्रयत्न करत असतील तर त्याचं मी स्वागतच करते. प्रत्येक गोष्ट व्यवहारासाठी नसते. काही गोष्टी प्रेमाच्यादेखील असतात. प्रेम हे आपल्या संस्कतीत खूप मोठी गोष्ट आहे. दोन्ही बाजूने नाती जपली जात असतील तर खूप आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीत नकारात्मक का पाहावं? आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत. त्या चांगल्या हेतूने लोकं करत असतात”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    यावेळी सुप्रिया सुळे यांना राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होतील का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “आधी कुटुंबाचा आनंद साजरा करु द्या. दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत हा क्षण तर साजरी करा”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *