Raj Thackeray and Uddhav Thackeray News : राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची तयारी दर्शवल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती न करण्याची अट घातली आहे. या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांनी या दोन्ही नेत्यांनी सद्सद्विवेकबुद्धीनुसार निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.
“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एका कुटुंबातील, एका परिवारातील आहेत. प्रत्येकाला वेगवेगळा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. हा अधिकार असताना मनसे प्रमुख म्हणून स्वतः राज ठाकरे काम करत असतात. तसेच उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काम करत असतात. या नात्याने त्यांनी दोन पक्षाच्या संदर्भात काय भूमिका घ्यावी हा 100 टक्के त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मनसे आणि उबाठा या पक्षातील जे घटक आहेत. त्यांना वाटले असेल की ते दोघे एकत्र यावेत. ते एकत्र यावेत की न यावेत हे कोणत्या राजकीय पक्षाने सांगण्याचे कारण नाही. माझे एकच मत आहे, की आपल्या सदसदविवेकबुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटत असेल त्यांनी तो तो निर्णय घ्यावा”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे नाराज? अजित पवार म्हणाले…
एकनाथ शिंदे हे नाराजीतून दरे गावाला आले आहेत का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “एकनाथ शिंदे यांनी आता मी तीन दिवस गावी जाणार आहे, असे अमरावतीवरून येताना सांगितले आहे. त्यांचे एक स्वप्न आहे, की नवीन महाबळेश्वर बसवण्याचे. त्यावेळी पर्यावरणाचे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले होते. तेथे त्यांना नवे महाबळेश्वर बसवायचे आहे. त्यांनी शेतीतही लक्ष घातलेले आहे. प्रत्येकाला आपापल्या गावाकडे आल्यानंतर समाधान वाटत असते तशा पद्धतीने त्यांना वाटतं आणि मुद्दाम गावाला येऊन शांततेत काही गोष्टींचा विचार करता येतो. महत्त्वाचं लोकांना तेथे बोलावून त्यांना चर्चा करायची असेल, पक्ष वाढ, राज्याचे प्रश्न सोडवणे किंवा आणखीन काही त्यांच्या मनात असेल त्याची चर्चा करता येते म्हणून ते गावी आलेले असतील. ते सांगताना ते तीन दिवस गावाला जाणार असल्याचे सांगून आले आहेत”, असं अजित पवार म्हणाले.

