Raigad Politics SKP Party Shocked : विधानसभा निवडणुकीनंतर कोकणातील रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाला धक्का बसणार आहे. कोकणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. शेकापच्या बालेकिल्ल्याला भाजपाने सुरुंग लावण्याची तयारी केली आहे.
पंडित पाटील यांच्याबरोबरच माजी मंत्री मीनाक्षी दे पाटील यांचे सुपुत्र आस्वाद पाटील हेही भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. शेकापचे सर्वेसर्वा असलेले जयंत पाटील यांचे बंधू असलेले पंडित पाटील हेच पक्षांतर करणार हा मोठा राजकीय भूकंप रायगडच्या राजकारणात मानला जात आहे.
रायगड जिल्हा शेकापचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्लाला खासदार सुनील तटकरे यांनी पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले. त्यानंतर गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येत सुनील तटकरेंनी दुसरा धक्का दिला. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मात्र शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांनी वर्चस्व राखत एक हाती सत्ता मिळवली. मात्र रायगड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर शेकाप काहीशी बॅकफूटवर जाताना दिसत आहे. आता शेकापचे माजी आमदाराने भाजपत पक्षप्रवेश केल्यानंतर शेकापला हा मोठा हादरा असणार आहे.
या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनीही आपण सोळा तारखेला भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली. आपल्याबरोबर उद्धव ठाकरे गटाचे हे कार्यकर्ते असतील. असंख्य कार्यकर्ते प्रवेश करतील मला अनेक पक्षांकडून विचारण्यात आली होती मात्र छोट्या पक्षांमध्ये जाण्यापेक्षा आपण भाजपसारख्या मोठ्या राष्ट्रीय पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शेकापकडून आपल्यावर कायम अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
कोण आहेत पंडित पाटील?
पंडित पाटील हे शेकापचे माजी आमदार रायगड जिल्हा बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांचे धाकटे बंधू आहेत. २०१४ साली त्यांनी अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शेकापकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळी अलिबाग विधानसभेवर त्यांनी शेकापचा झेंडा फडकवला होता. रायगड जिल्ह्यामध्ये शेकापचा मोठा दबदबा आहे. प्रत्येक निवडणुकीत शेकापची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरते.
पंडित शेठ पाटील यांनी शेकाप नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत स्पष्ट केलं की, ‘शेकापमध्ये सध्या नेतृत्वाची कमतरता असून, गेल्या काही काळात मला सातत्याने डावललं जात होतं.’ त्यांनी पुढे सांगितलं की, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली असता त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘तुम्ही भाजपमध्ये या, आपण ग्रामीण भागातील वंचित जनतेसाठी एकत्र काम करू,’ असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं, असंही पाटील यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीची ताकद मोठी होती, परंतु आता त्या आघाडीत नेतृत्व संकट उभं राहिलं आहे. यामुळे जनतेचा भ्रमनिरास होत असून, विकासाच्या मुद्द्यावर भाजपच सक्षमपणे काम करत असल्याचं पाटील यांचं मत आहे.
या निर्णयामुळे रोहा व संपूर्ण रायगड जिल्ह्यात भाजपला नवे बळ मिळणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पंडित शेठ पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश ही राजकीय घडामोड लक्षवेधी ठरत असून भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेलाही हा इशारा असल्याचे बोलले जात आहे.