ST Bus Employee Salary: एसटीतील ८७ हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा निम्माच पगार एप्रिल महिन्यात जमा झाला आहे. महामंडळाकडे निधी नसल्याने निम्मा पगार कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
हायलाइट्स:
- निधीच्या कमतरतेमुळे कर्मचाऱ्यांचा पगार रखडला
- कर्मचारी, सुरक्षा रक्षकांना फटका
- शिकाऊ, निवृत्त कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन

‘निधी उपलब्ध करावा’
‘एसटीतील ८० टक्के कर्मचाऱ्यांवर विविध कर्ज असून पगाराच्या अनियमिततेमुळे हप्त्यांवर परिणाम होतो. निम्या पगारात हप्ता, घरखर्च, शिक्षण खर्च कसा करायचा असे प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे आहेत. ४० ते ४२ अंशांच्या तापमानात प्रवासी सेवा चालक-वाहकांकडून विनातक्रार देण्यात येते. यामुळे सरकारने प्राधान्याने महामंडळाला निधी उपलब्ध करावा’, अशी मागणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे.

१५ तारखेला बैठक
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना अपर मुख्य सचिवांना दिल्या आहेत. मार्च महिन्यातील पगारासाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांची १५ एप्रिलला सकाळी ११.३० वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सरकार जबाबदार‘एसटी महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच वेतनाच्या ५६ टक्के पगार एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. याला सरकार जबाबदार असून पगाराची जबाबदारी पूर्ण केली नाही’, अशी टीका एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातील अनियमितेबाबत एसटी महामंडळाचे वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी यांना तुरूंगात पाठवा, अशी मागणी विरोधकांनी केली होती.