Prashant Koratkar News : प्रशांत कोरटकर याला अखेर 50 हजारांच्या जातमुचल्यावर कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण त्याला जामीन मिळाला असला तरी त्याची आजची रात्र जेलमध्येच जाणार आहे. त्याच्या जामीनासाठी न्यायालयाने काही अटी ठेवल्या आहेत.
तेलंगणातून घेतलं होतं ताब्यात
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना नागपूर येथील प्रशांत कोरटकर याने २४ फेब्रुवारीला मध्यरात्री फोन करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अवमानकारक भाषा वापरत इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या संभाषणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर आल्यानंतर शिवप्रेमींमध्ये एकच संतापाची लाट उसळली. या प्रकरणी प्रशांत कोरटकर याच्या विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र अटक होण्याच्या भीतीने कोरटकर फरार झाला.
दरम्यानच्या काळात त्याला अटकपूर्व जामीन देखील मिळाला. मात्र या अटकपूर्व जामीन विरोधात पोलीस उच्च न्यायालयातून गेले आणि कोल्हापूर न्यायालयात दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अटकपूर्व जामीन रद्द झाला. अटकपूर्व जामीन रद्द झाल्याने प्रशांत कोरटकर चंद्रपूर तेलंगणा अशा ठिकाणी महिनाभर पोलिसांना चकवा देऊन पळत होता. मात्र २५ मार्चला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून त्याच्या मुसक्या आवळल्या आणि कोल्हापुरात घेऊन आले. यावेळी संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी कोल्हापुरी पायतान आणि चिल्लर दाखवत कोरडकरचा निषेध व्यक्त केला. पहिल्यांदा त्याला पाच दिवस तर दुसऱ्यावेळी दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. ३० मार्चला त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची रवानगी कळंबा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
आजची रात्र देखील कळंबा कारागृहातच
मात्र न्यायालयीन कोठडी मिळताच प्रशांत कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी जामीनासाठी अर्ज केला. मात्र सह दिवाणी न्यायालयाने जामीन ना मंजूर केल्याने कोरटकरने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावर आज न्यायाधीश डी.व्ही.कश्यप यांच्यासमोर सुनावणी झाली. जामिनावर यापुर्वी दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर यावर आज निर्णय होणार असल्याने, सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
अखेर ५० हजारांच्या जातमुचलक्यावर कोरटकरचा जामीन मंजूर करण्यात आला असून साक्षीदार, फिर्यादी यांना त्रास द्यायचा नाही तसेच जेव्हा कोल्हापूर पोलीस चौकशीसाठी बोलावतील तेव्हा त्वरित हजर राहावं अशा अटीही न्यायालयाने घातल्याचे कोरटकर यांचे वकील प्रणिल कालेलकर यांनी सांगितले आहे. मात्र कोरटकरला आज जामीन मिळाला असला तरी कागदपत्राची पूर्तता पूर्ण न झाल्याने कोरटकरला आजची रात्र देखील कळंबा कारागृहातच काढावी लागणार आहे. उद्या सकाळी कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर कोरटकरला कळंबा कारागृहातून बाहेर काढण्याची शक्यता आहे.
महापुरुषांचा अवमान करणाऱ्याला शिक्षा व्हायला हवी- इंद्रजीत सावंत
दरम्यान प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाल्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात राहून महापुरुषांचा अवमान करणाऱ्याला जामीन मंजूर होतो. महापुरुषांचा अवमान करणाऱ्याला शिक्षा व्हायला हवी. मात्र आता कोरटकरला जामीन मंजूर झाला असला तरी न्यायालयाने घालून दिलेल्या अटी आणि शर्ती तो पाळतो की नाही यावर आमची करडी नजर असणार असल्याचे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी म्हटल आहे.

