• Sat. Aug 29th, 2026

Pune PMC Engineer Recruitment Paper Cheating : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘हायटेक कॉपी’ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन उमेदवारांसह सहा जणांवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित उमेदवारांची निवड रद्द करण्यात आली आहे.

पुणे महापालिका ज्युनियर इंजिनिअर परीक्षेचा पेपरमध्ये हायटेक कॉपी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजित दराडे, ​पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत हायटेक कॉपीचा एक भलताच प्रकार समोर आला आहे. साध्या डोळ्यांनी सहज न ओळखता येणाऱ्या ‘कॅमेरा चष्म्या’चा वापर करून थेट संगणकावरील प्रश्नपत्रिका स्कॅन करण्यात आली आणि उत्तरे मिळवली गेली. हा सगळा प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील एका परीक्षा केंद्रावर घडला असून, महापालिकेच्या तांत्रिक पडताळणीत हा ‘मुन्नाभाई’ पॅटर्न उघड झाला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन उमेदवारांसह मदत करणाऱ्या पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​लॉगशीटमुळे फुटले बिंग

मनपाच्या 169 कनिष्ठ अभियंता पदांसाठीजवळपास 21 हजार उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा दिली होती. निकालानंतर जेव्हा कागदपत्रांची छाननी आणि तांत्रिक लॉगशीट तपासण्याचं काम सुरू झालं, तेव्हा छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा येथील ‘आयकॉन डिजिटल झोन’ केंद्रावरील तीन उमेदवारांचा डेटा पाहून अधिकाऱ्यांचे डोके चक्रावले. या उमेदवारांनी सुरुवातीच्या अर्ध्या तासात फक्त प्रश्न वाचून काढले आणि नंतर ते वॉशरुमला गेले. तिथून परत आल्यावर शेवटच्या अवघ्या 30 मिनिटांत त्यांनी 100 पैकी 90 हून अधिक प्रश्न अचूक सोडवले. धक्कादायक म्हणजे, स्क्रीनवर प्रश्न सोडवताना त्यांनी माऊसचा वापरच केला नसल्याचे लॉगशीटमध्ये स्पष्ट झालं.

Maharashtra TimesMaharashtra Rain : महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कधी येणार? पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज

​चष्म्यात कॅमेरा आणि बाहेरून रसद

संशय बळावल्यानंतर महापालिकेने तब्बल दीड महिना 20 हजारांहून अधिक उमेदवारांच्या डिजिटल हालचालींचा बारकाईने तांत्रिक तपास केला. प्राथमिक चौकशीनुसार, चष्म्यामध्ये बसवलेल्या सूक्ष्म कॅमेऱ्याद्वारे प्रश्नपत्रिका स्कॅन करून बाहेर बसलेल्या साथीदारांना पाठवण्यात आली आणि तिथून मिळालेल्या उत्तरांनुसार पेपर सोडवला गेला. ​या प्रकरणात गजानन पाचे, अंकित वाघमारे यांच्यासह परीक्षा केंद्राशी संबंधित विकास गायकवाड व इतर साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Maharashtra TimesHingoli Crime : दोन महिन्यापूर्वीच हिंगोलीत बदली, PSI अमोल गंगलवाड यांनी वर्दीवरच आयुष्य संपवलं; कारण अद्याप अस्पष्ट

​उमेदवार बाद, रॅकेटचा शोध सुरू

या गैरप्रकाराला दुजोरा देत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी सांगितलं की, संशयित उमेदवारांना भरती प्रक्रियेतून तत्काळ बाद करण्याची कारवाई सुरू आहे. दरम्यान, या हायटेक कॉपीमागे स्पर्धा परीक्षांमधील मोठे रॅकेट सक्रिय आहे का, याचा कसून तपास आता शिवाजीनगर पोलीस करत आहेत.