Ajit Pawar Angry on Manikrao Kokate : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे कान टोचल्याची माहिती समोर येत आहे. सातत्याने पक्षाला अडचणीत आणणारे वक्तव्य केल्याने अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले.
माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. नुकतंच त्यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल वक्तव्य केलं. “शेतकरी कर्जमाफीच्या पैशांचा एक रुपयाही शेतात गुंतवणूक करत नाहीत. तुम्हाला पाईपलाईला, जलसिंचनाला, शेततळ्याला पैसे, सगळ्या गोष्टींना पैसे. शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, ह्याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडा करा, लग्न करा”, असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. याच वक्तव्यावरुन अजित पवारांनी त्यांचे कान टोचल्याची माहिती आहे.
अजित पवार कोकाटेंवर संतापल्याची माहिती
राज्य मंत्रिमंडळाची दर मंगळवारी बैठक पार पडते. या बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री मुंबईत येतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची आणि महत्त्वाच्या नेत्यांची अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी दर मंगळवारी आढावा बैठक पार पडते. त्यामुळे आजही नित्य नियमाने अजित पवारांच्या निवासस्थानी बैठक आयोजित होती. या बैठकीला माणिकराव कोकाटे हे अर्धा तास उशिराने गेले. त्यामुळे अजित पवार त्यांच्यावर संतापल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासूनच्या पक्षाच्या जनता दरबाराला कोकाटे यांनी अनुपस्थिती लावण्यावरुनही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना पक्षाला अडचणीत आणतील, अशी वक्तव्ये करु नका, अशी समज दिली आहे. कोकाटे यांनी याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. “आमचे ओएसडी आणि पीए मुख्यमंत्रीच ठरवत असल्याने आमच्या हातात काही राहिलेलं नाही, असं वक्तव्य करत माणिकराव कोकाटे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती”. त्यांच्या या वक्तव्याचीदेखील त्यावेळी चर्चा झाली होती.

