Vidarbh Weather Update : विदर्भात उष्णता आणि उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विदर्भात आज सर्वाधिक तापमान अकोल्याचे होते. त्यापाठोपाठ ब्रम्हपुरी, चंद्रपूर शहराचे तापमान होते. आज अकोल्याचे तापमान ४४.२ अंशावर पोहचले.
विदर्भासाठी उन्हाळा नेहमीच तापदायक ठरतो. सूर्य अक्षरश: येथे आग ओकीत असल्याचा भास होतो. दुपारच्या सुमारास घराच्या बाहेर जाणे जीवावर येते. खरंतर अशी अशी स्थिती मे महिन्यात उद्भवीत असते. मात्र यावर्षी एप्रिल महिनाच तापदायक ठरताना दिसत आहे. विदर्भात आज नोंद झालेले तापमान धडकी भरविणारे ठरले. एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा उकाड्याचा ठरला. विदर्भातील अकोला शहराचे तापमान ४४.२ अंशावर पोहचले. विदर्भातील सर्वाधिक तापमान असलेले शहर आज अकोला ठरले. त्यापाठोपाठ ब्रम्हपुरी शहराचे तापमान ४३.८ अंश होते. तर चंद्रपूर शहराचे तापमान ४३.६ वर पोहोचले. विदर्भात यावर्षी सर्वाधिक तापमानची नोंद अकोला शहराच्या नावावर नोंदली गेली आहे.
तप्त उन्हाळ्यापासून सुटका नाही
सध्या विदर्भात उष्ण लहर सुरू आहे. त्यामुळे ह्या आठवड्यात तापमान सतत वाढत आहे. पुढील दोन दिवसांत विदर्भातील तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी केले आहे.