पुणे येथील वारजे माळवाडीमध्ये दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चार लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शमशाद शेख यांच्या दागिन्यांच्या दुकानात ही चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती. तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला पकडले. आरोपीने पत्नीच्या मदतीने ही चोरी केली होती.
वारजे माळवाडी येथील अष्टविनायक चौकात शमशाद शेख यांच्या दागिन्यांच्या दुकानात २५ मार्च रोजी चोरी झाली होती. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने चार लाख ५७ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. रात्री आठ वाजता ही बाब लक्षात आल्यानंतर शेख यांनी त्वरित वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. वरिष्ठ निरीक्षक विश्वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले.
उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १५०पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. पोलिस अंमलदार अमित शेलार यांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. त्याने पत्नीच्या मदतीने चोरी केली. आरोपीकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संजय नरळे, पोलिस अंमलदार अर्जुन पवार, संजीव कळंबे, अमित शेलार, शरद पोळ, सागर कुंभार, बालाजी काटे, निखिल तांगडे, गोविंद कपाटे, अमित जाधव यांनी केली.
शमशाद शेख यांनी आयुष्यभराच्या कष्टांतून दोन लाख ५७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि दोन लाख रुपयांची रक्कम जमवली. ती चोरीला जाऊ नये, यासाठी त्या रोज हा सर्व ऐवज दुकानात घेऊन जात आणि संध्याकाळी आपल्यासोबतच घरी नेत. इतकी काळजी घेऊनही त्यांचा मुद्देमाल चोरीस गेला.