• Wed. Apr 16th, 2025 4:24:08 AM
    Tanisha Bhise Death Case : पैशांच्या डिपॉझिटसाठी उपचार नाकारणाऱ्या सर्व हॉस्पिटल्सवर कारवाई होणार? आरोग्यमंत्र्यांकडून महत्त्वाची माहिती

    Maharashtra Health Minister Prakash Abitkar : “कोणत्याही डॉक्टराने सार्वजनिक आरोग्याच्या सेवेला नाकारता कामा नये. दुर्दैवाने आपल्याकडून नाकारलेल्या माणसाला पलिकडच्या बाजूला जावं लागत आहे, त्यानंतर दुर्दैवी घटना घडते. एकाबाजूला दोन बाळांचा जन्म होतोय आणि दुसऱ्या बाजूला आईला आपण गमावतोय ही खूप दु:खाची गोष्ट आहे”, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर करण्यात आलेल्या आरोपाप्रकरणी वातावरण तापलं आहे. भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना पैशांसाठी उपचार नाकारल्याचा आरोप दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर करण्यात आला आहे. तनिषा भिसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर जसे आरोप करण्यात आले आहेत, तसंच इतर कोणत्या हॉस्पिटलमध्ये पैशांसाठी उपचार नाकारण्यात आला तर अशा ट्रस्टच्या रुग्णालयांवर कारवाई होणार असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.

    “ही अतिशय खेदजनक बाब आहे की, ज्यावेळेला उपचारासाठी आपल्याकडे लोक येत आहेत त्यावेळी डॉक्टरांचं पहिलं प्राधान्य हे त्यांच्यावर उपचार करणं हे आहे. पण दुर्दैवाने या घटनाक्रममध्ये ज्याप्रकारे रुग्णाच्या नातेवाईकांना त्रास झाला, त्याचबरोबर एकूणच कामकाजाबद्दल अतिशय गंभीर तक्रारी येत आहेत. साहजिकच काल ही घटना घडल्यानंतर समाजमाध्यमे असतील, किंवा इतर माध्यमांतून लोकांच्या तीव्र भावना येत आहेत. त्याची दखल घेत आपण आरोग्य विभागाच्या वतीने डेप्युटी डायरेक्टर पुणे यांना सूचना दिलेल्या आहेत”, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

    ‘नियमांचे उल्लंघन असेल तर…’

    “या हॉस्पिटलच्या झालेल्या घटनाक्रमाबाबत, त्या घटनेच्या अनुषंगाने ज्या काही चुका झाल्या असतील त्याबाबत योग्य ती चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीनंतर जो काही अहवाल येईल त्यानुसार रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. चौकशी समितीला सूचना दिल्या आहेत. ते आज दिवसभर काम करतील. आपण सर्वांना वेळ दिला पाहिजे. त्यांचं म्हणणं मांडून दिल्यानंतर जे काही आरोग्य विभागाचे नियम आहेत, नियमांचे उल्लंघन असेल तर त्यापद्धतीने निश्चितपणे हॉस्पिटलवर कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
    Tanisha Bhise Death Case: मी पोरगी गमावली, आंदोलन केलं, काहीही झालं नाही; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आईचा आक्रोश

    ‘शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करु’

    “हॉस्पिटलने आपला खुलासा करणे साहजिक आहे आणि तो केलाही पाहिजे. आरोग्य विभागाच्या वतीने आमची टीमही त्यांचं म्हणणं ऐकून घेईल. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. पण सार्वजनिक दृष्टीकोनाने पाहिलं तर कोणत्याही डॉक्टराने सार्वजनिक आरोग्याच्या सेवेला नाकारता कामा नये. दुर्दैवाने आपल्याकडून नाकारलेल्या माणसाला पलिकडच्या बाजूला जावं लागत आहे, त्यानंतर दुर्दैवी घटना घडते. एकाबाजूला दोन बाळांचा जन्म होतोय आणि दुसऱ्या बाजूला आईला आपण गमावतोय ही खूप दु:खाची गोष्ट आहे. या सर्व गोष्टींचा कायदेशीर दृष्टीने विचार करुन, योग्य ती तपास करुन, शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करु”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आबिटकर यांनी दिली.

    हॉस्पिटल्सवर कशाप्रकारे कारवाई केली जाणार?

    “राज्यातील सर्व ट्रस्टच्या खाली नोंदणी केलेल्या सर्व हॉस्पिटलसाठी एक एसओपी जाहीर केली जाईल. त्या एसओपीच्या माध्यमातून अशा पद्धतीने रुग्णाला दाखल करुन घेण्यात टाळाटाळ असेल, आर्थिक रक्कम घेण्याचा विषय असेल तर कारवाई केली जाईल”, अशी महत्त्वाची माहिती देखील आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *