• Tue. Mar 10th, 2026
    रात्री झोपी गेले ते उठलेच नाहीत, एक क्लू सापडला अन् भयंकर घटनेचा उलगडा, पुणे हादरलं

    Pune Husband Murder Case: पुण्यात पुन्हा एकदा एक भयंकर घटना घडली आहे. प्रियकरासाठी पुन्हा एकदा एखा पतीचा बळी गेला आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काटा काढला.

    Lipi

    प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे: लोणी काळभोर परिसरात मंगळवारी (१ एप्रिल) पहाटे एक धक्कादायक हत्येची घटना उघडकीस आली आहे. वडाळे वस्ती येथे राहणारे रवींद्र काशिनाथ काळभोर (वय ४५) यांची त्यांच्या घराबाहेर अंगणात पलंगावर झोपले असताना डोक्यात दगडाने आणि लाकडी दांडक्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

    अवघ्या तीन तासांत लोणी काळभोर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत मयत रवींद्र यांची पत्नी शोभा रवींद्र काळभोर (वय ४२) आणि तिचा प्रियकर गोरख त्रंबक काळभोर (वय ४१) यांना अटक केली आहे.

    याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रवींद्र काळभोर हे नेहमीप्रमाणे घराबाहेर पलंगावर झोपले होते. त्याचवेळी आरोपी गोरख काळभोर याने खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांना ठार केले. सकाळी रवींद्र हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.
    Pune Hit And Run: पुण्यात पुन्हा हिट अँड रन! मॉर्निंग वॉक करणाऱ्या तरुणाला कारची धडक, अन्… CCTVत अखेरचे क्षण कैद

    अनैतिक संबंध झाले उघड

    पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता मयत रवींद्र यांची पत्नी शोभा आणि गोरख यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्हा कबूल केला. तपासात असे निष्पन्न झाले की, शोभा आणि गोरख यांच्यातील संबंधांना रवींद्र अडथळा ठरत होते. त्यामुळे या दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याचा कट रचला आणि सोमवारी रात्री त्याच्यावर हल्ला करत त्याला संपवलं.

    पोलिसांची तत्परता

    या खुनानंतर शोभा आणि गोरख हे दोघेही काहीच घडले नाही अशा अविर्भावात वावरत होते. मात्र, पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या गुन्ह्याचा बनाव उघडकीस आणला आणि दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, उदय काळभोर, सर्जेराव बोबडे, दिगंबर सोनटक्के, पूजा माळी यांच्यासह पोलीस कर्मचारी देवीकर, शिंदे, वनवे, जोहरे, नवले, होले यांच्या पथकाने केली.

    या घटनेने लोणी काळभोर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. सध्या दोन्ही आरोपींवर पुढील कारवाई सुरू असून, या प्रकरणाचा अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed