Nagpur Congress new appointment – हर्षवर्धन सपकाळांनी नागपूरमध्ये माजी मंत्र्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाची संघटना बांधणी करुन फडणवीसांना घेरण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे.
काँग्रेस (Congress) कार्यसमितीने तीन वर्षांपूर्वी उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिरात अनेक निर्णय घेतले. यात कुणालाही पाच वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर राहू नये, एक व्यक्ती एक पद, एका कुटुंबातील दोघांना पद नको यासारखे निर्णय होते. या निर्णयानंतर विद्यमान अध्यक्ष आमदार विकास ठाकरे व तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी राजीनामा दिला होता, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन त्यांना कायम ठेवण्यात आले. दरम्यान, लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीमुळे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फेरबदल करण्याचे टाळले होते.
आमदार विकास ठाकरे यांना शहराध्यक्षपदी अकरा वर्षे झाली आहेत. त्यामुळे त्यांचे विरोधक बरेचदा सक्रिय होतात. अनेकवेळा वाद दिल्ली दरबारात गेले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पक्ष सांभाळल्याने ठाकरे यांना कायम ठेवण्यात आले. विधानसभेच्या दोन निवडणुकांमध्ये ते सलग निवडून आले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी रामटेकमधून विधानसभा निवडणुकीची तयारी केली. मात्र, ही जागा शिवसेनेकडे (ठाकरे गट) गेल्याने त्यांनी बंडखोरी केली. त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असले तरी, संघटनेवर त्यांचे वर्चस्व अजुनही कायम आहे, हे विशेष. शहर व ग्रामीणमध्ये हर्षवर्धन सपकाळ कुणाला संधी देतात आणि मोर्चेबांधणीत कोण सरस ठरते, याकडे आता लक्ष लागले आहे.