महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Mar 2025, 4:16 pm
Buldhana News : रविकांत तुपकर हे येत्या 19 मार्चला मुंबईत येऊन अरबी समुद्रात आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांचं आंदोलन असणार आहे. पण त्यांच्या या आंदोलनाआधीच बुलढाणा पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, पिकविमा, सोयाबीनचा-कापसाचा भावफरक यासह सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान, दूध उत्पादकांना मदत आणि भाववाढ तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी 19 मार्चला रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अरबी समुद्रात सातबारे बुडवून कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार आहेत. तसेच सोयाबीन, कापूस बुडवून शासनाचे लक्ष वेधणार आहेत. या आंदोलनात सहभागी होऊन स्वतःला कर्जमुक्त करण्यासाठी गावागावातील शेतकरी मुंबईला जाण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये काय म्हटलंय?
रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सर्व शेतकरी 18 मार्चला सकाळी 9 वाजता बुलडाणा शहरातील क्रांतिकारी हेल्पलाइन सेंटर वरून मुंबईकडे आगेकूच करणार आहेत. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना कलम 168 नुसार नोटीस बजावली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच इतरांच्या जीवितवस धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आंदोलन करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये नमूद आहे.
रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम, नेमकं काय म्हणाले?
दुसरीकडे रविकांत तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. अशा नोटिसेसने आपल्या घरातील कपाट भरलेले आहे. या नोटीसला आम्ही घाबरत नाही, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे. आमचे आंदोलन दडपण्याचा आणि शेतकरी चळवळ बंद पाडण्याचा हा शासनाचा आणि प्रशासनाचा डाव आहे. पण आम्ही डगमगणार नाहीत. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन करणारच, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केली आहे.
Anil Deshmukh : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी रणनीती, अनिल देशमुख यांनी आतली बातमी फोडली
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा, सोयाबीन- कापूस भावफरक, नाफेडमध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान, ऊसाला एकरकमी एफआरपी द्यावी यासह कांदा, दूध, धान आणि इतर उत्पादनाना अनुदान या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत. या आंदोलनात कुठेही हिंसा होणार नाही, कायदा हातात घेतला जाणार नाही. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत, तरीही पोलिसांनी नोटीस देऊन आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे. अशा कितीही नोटीस दिल्या तरी आम्ही आंदोलन करणारच, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे.
तुपकरांचा पोलिसांना इशारा
18 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता बुलढाणा येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या हेल्पलाइन सेंटर समोर सगळे शेतकरी एकत्र जमणार आहेत. तिथून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मुंबईकडे आगेकूच करणार आहेत. रात्री मुंबईच्या वेशीवर मुक्काम करून 19 मार्चला सकाळी रविकांत तूपकरांचे नेतृत्वात सगळे शेतकरी नरिमन पॉईंट येथे अरबी समुद्रावर पोहोचणार आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने आमचा हक्क मागण्यासाठी जात आहोत. त्यामुळे पोलिसांनी उगीच आडवा – आडवी करू नये, आम्हाला मुंबईत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
