• Wed. Mar 18th, 2026

    फायर प्रॉक्सिमिटी सूटचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वाटप – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 15, 2025
    फायर प्रॉक्सिमिटी सूटचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वाटप – महासंवाद

    कोल्हापूर, दि. 15 (जिमाका): जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात अग्निशमन दलाच्या जवानांना आगीच्या आपत्तीचा सामना अधिक सक्षमपणे करता यावा तसेच त्यांच्या क्षमता वर्धनासाठी, राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रॉक्सिमिटी सूट देण्यात आले आहेत. या सूटचे जिल्ह्यातील 10 नगरपालिकांना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वाटप करण्यात आले .

    यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानरगपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, निवासी उप जिल्हाधिकारी संजय तेली, प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नागेंद्र मुदगेकर, सहा.आयुक्त नगरपालिका प्रशासन तसेच अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

    आग लागलेल्या भागात प्रवेश करून आगीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे सहज शक्य व्हावे या उद्देशाने फायर प्रॉक्सिमिटी सूट निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येकी 6 सूट याप्रमाणे जिल्ह्यातील 10 नगरपालिकांना सुमारे 60 सूट देण्यात आले. हा सूट परिधान करुन फायरमन आग लागलेल्या भागात जाऊन 60 अंश सेल्सिअस तापमान असेल तरीही काम करू शकतो. यामध्ये हेलमेट, ग्लोव्हज, शर्ट, पॅट आणि गम बूट इत्यादींचा समावेश आहे .

    यावेळी जिल्ह्यातील जयसिंगपूर, कुरुंदवाड, कागल, पन्हाळा, मुरगूड, मलकापूर, गडहिंग्लज, वडगांव, हुपरी, आणि शिरोळ या 10 नगरपालिकांच्या अग्निशमन दलास या सूटचे वाटप करण्यात आले.

    वाहतूकदारांची विनाकारण अडवणूक नको

    वाहतूकदारांमुळे सामाजिक स्वास्थ टिकण्यास मदत होते. समाजाच्या अनेक गरजा पूर्ण होण्यास मदत होते त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) वाहतूकदारांची विनाकारण अडवणूक करू नये, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले .

    जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत प्रादेशिक परिवहन विभागाच्या विविध प्रश्नांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

    याप्रसंगी आमदार चंद्रदीप नरके, कोल्हापूर महानरगपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नीता सूर्यवंशी – पाटील, लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, मल्हारी पाटील आदी उपस्थित होते.

    पालकमंत्री आबिटकर पुढे म्हणाले की, 15 वर्षांपुढील गाड्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार काम करू तर वाहनाच्या ओव्हरलोडींगबाबत आरटीओमार्फत जो अवास्तव दंड आकारला जातो आहे त्या दंडासंदर्भात आरटीओने फेरविचार करावा, अशी सूचना आमदार चंद्रदीप नरके यांनी यावेळी केली.

    या आढावा बैठकीत कागल येथील खाजगी आरटीओ चेक पोस्ट बॉर्डर बंद करावी, तावडे हॉटेल जवळील 13.5 जागा राज्य शासनाने ट्रक टर्मिनल्स साठी आरक्षित केली आहे त्या जागेवर मनपाने त्वरित ट्रक टर्मिनल्स उभा करावे, ई – चालन पद्धत रद्द करावी, तसेच वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची अट स्थगित करावी किंवा त्याला मुदतवाढ द्यावी याचे गुजरात राज्याप्रमाणे नंबर प्लेटच्या विक्रीचे दर ठेवावे, महामार्ग पोलिसांना पेपर तपासणीचे दिलेले अधिकार रद्द करावे अशा मागण्या लॉरी असोसिएशनच्यावतीने या बैठकीत करण्यात आल्या. या अनुषंगाने महामार्ग पोलीस , परिवहन विभागाची मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक घेण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीसाठी मोटार वाहन निरीक्षक विजयसिंह भोसले, शंभूराजे पवार विशाल बागडे, लॉरी असोशिएशनचे सचिव हेमंत डिसले खजिनदार प्रकाश केसरकर यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक आदी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *