• Sat. Aug 15th, 2026

जिल्ह्यात ३२ हजारावर शेतकऱ्यांना ३१६ कोटी रुपयांची कर्जमुक्ती – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 15, 2026

  • 82 हजार शेतकऱ्यांना 170 कोटी रुपयांची वीज सवलत
  • 1 लाख 32 हजार रुग्णांना उपचारासाठी 336 कोटींचे सहाय्य

वर्धा, दि.१५ (जिमाका) : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. जिल्ह्यात या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या 32 हजार 535 इतकी असून 316 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ त्यांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 हजार 635 शेतकऱ्यांच्या खात्यात 107 कोटी जमा करण्यात आले आहे, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.

पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहनानंतर शुभेच्छा संदेशपर भाषण करतांना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिवीक्षाधिन अधिकारी शोभिका पाठक तसेच माजी सैनिकांचे कुटुंबिय, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीस पालकमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व शुरविर, देशभक्तांना नमन केले. स्वातंत्र्यानंतर देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेणे फार मोठे आव्हान होते. देशासह आपले राज्य देखील आज विकासाच्या बाबतीत झपाट्याने पुढे जात आहे. गेल्या दहा बारा वर्षात देशाने विकासाच्या बाबतीत वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय काम केले असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना वीज सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील राज्य शासनाने घेतला. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेतून जिल्ह्यातील 82 हजार 864 शेतकऱ्यांना मार्च अखेर पर्यंत 170 कोटींची वीज सवलत देण्यात आली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून प्रत्येकी 6 हजार याप्रमाणे जिल्ह्यातील 1 लाख 3 हजार शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरु केली. जिल्ह्यात या योजनेतून 1 हजार 80 प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली तर 24 कोटीहून अधिक रक्कमेचे बॅंक कर्ज वितरीत करण्यात आले. मंजूर प्रकल्पांपैकी 950 उद्योग कार्यान्वित देखील झाले आहे. या प्रकल्पांना 9 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

सर्वसामान्य नागरिकांना विनामुल्य आरोग्य तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यावर्षी आपण आरोग्य अमृत महोत्सव राबविला. विधानसभा मतदारसंघनिहाय आयोजित या शिबिरात 21 हजार 122 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीत विविध आजार आढळून आलेल्या रुग्णांना पुढील उपचार देखील आपण उपलब्ध करून देतो आहे.

तळेगाव (शामजीपंत) येथे 155 कोटी खर्चाचे 300 खाटांचे रुग्णालय मंजूर झाले. हिंगणघाट येथे 151 कोटी खर्चाची 400 खाटांची नवीन रुग्णालय इमारत मंजूर झाली. हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देखील होत आहे. जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनिय काम होत आहे. आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेंतर्गत 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जातात. जिल्ह्यात 1 लाख 32 हजार रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी 336 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे.

पायाभूत सुविधांच्या उभारणीवर आपण भर देतो आहे. गेल्यावर्षी 23 कोटींचे वनभवन आपण मंजूर करून घेतले. इंझापूर येथे नवीन जिल्हा कारागृहाच्या निर्मितीसाठी 120 एकर जागा, सहकार संकुलसाठी 2 एकर जागा मंजूर झाली आहे. आर्वी व देवळी येथे तालुकास्तरीय एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासाठी प्रत्येकी 2 कोटी 38 लाख व 2 कोटी 50 लाख खर्चाच्या इमारती मंजूर झाल्या. जिल्हास्तरीय महिला व बाल विकास भवनसाठी 15 कोटी रुपयांचा प्रस्ताव आपण केला आहे. महिलांसाठी हक्काचे ठिकाण या भवनाच्या रुपाने उभे राहणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

पुलगाव येथे वर्धा नदीवर तसेच आजनसरा येथे यवतमाळ वर्धा जिल्हा सिमेवर प्रत्येकी 40 कोटी रुपये खर्चाचे मोठे पुल बांधण्यात येत आहे. आंजी येथे 26 कोटी रुपये खर्च करून ग्रामीण रुग्णालय व सेलू येथे 47 कोटी रुपये खर्च करून न्यायालयीन इमारत बांधण्यात येत आहे. यापुर्वी कधीही झाली नसेल इतकी विकासाची कामे जिल्ह्यात होत आहे. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणावर आपला भर आहे. त्यामुळे पोलिस विभागास जिल्हा नियोजनमधून 5 कोटी 71 लाख उपलब्ध करून देण्यात आला. जिल्ह्याकरीता न्यायसहाय्य वैज्ञानिक प्रयोगशाळा व निवासी प्रशिक्षण केंद्र मंजुर केले. या केंद्राच्या कार्यालयाकरीता तात्पुरत्या स्वरुपात 97 लाखाचा निधी देखील देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील खेळाडूंना उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. राज्य शासनाकडून क्रीडा संकुलांसाठी निधी मिळतो. आपण जिल्हा नियोजन मधून देखील यासाठी भरीव तरतूद केली आहे. जिल्हा क्रीडा संकुलात 400 मीटर सिंथेटीक धावनपथ व पॅालीमर ग्रास फुटबॅालचे मैदान आपण उभारतो आहे. 13 कोटी रुपये खर्च करून होत असलेले हे मैदान नोव्हेंबर पर्यंत पुर्ण होण्याची अपेक्षा आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध योजनेतून जिल्ह्याला 24 हजार घरकुले मंजूर झाली आहे. त्यापैकी 10 हजारावर घरे बांधून पुर्ण झाली. घरकुलासाठी जागा उपलब्ध नसल्याच्या कारणावरून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, अशा सुचना आपण केल्या आहे. घरकुलासाठी शासकीय जागा द्या, जागा उपलब्ध नसल्यास जागा खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्याचे निर्देश देखील दिले आहे. जिल्ह्यात लखपती दीदी हा उपक्रम आपण मोठ्या प्रमाणावर राबविला. स्वयंसहायता समुहातील 1 लाख 41 हजार महिलांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवून लखपती दीदी बनविण्यात आल्या आहे.

महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शी आणि कार्यक्षम होत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 42 हजारावर महसूली सेवा व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले. गेल्यावर्षी राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दरम्यान राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवाड्यात 72 हजारावर लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे.

बोर आपल्या जिल्ह्यातील महत्वाकांक्षी व्याघ्र प्रकल्प आहे. येथे हमखास वाघाचे दर्शन होत असल्याने गेल्या काही दिवसात पर्यटकांची संख्या वाढली आहे. येथे पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी 10 कोटींची विकास कामे केली जात आहे. मृद व जलसंधारणाचे महत्व भावी युवा पिढीला महत्व पटवून देण्यासाठी 15 ते 21 ऑगस्ट या कालावधीत जलसंधारण सप्ताह राबविण्यात येत आहे. याअंतर्गत दि.21 ऑगस्ट रोजी महा वॅाकेथॅान तसेच युवकांसाठी जलसंधारण या विषयावर इन्स्टाग्राम रील स्पर्धा आयोजित असून या चांगल्या उपक्रमास योगदान देण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी यावेळी केले.

सुरुवातीस पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहन केले. त्यानंतर परेड निरिक्षण तसेच पोलिस दलाच्यावतीने मानवंदनेचा कार्यक्रम पार पडला. शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी वीर माता, वीर पत्नींचा सत्कार तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव देखील पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते करण्यात आला.

0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed