Beed Khokya Bhai Satish Bhosale : पोलीस ज्या आरोपीच्या शोधात आहे तो आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सतीश भोसले याने आपल्या व्हायरल व्हिडीओवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सतीश भोसले काय म्हणाला?
“प्रकरण दोन आहेत. एक प्रकरण बॅटने मारहाण करण्याचं आहे. माझे मित्राच्या पत्नीची तो माणूस वारंवार छेड काढत होता. त्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. माझ्याकडे तुझा अंघोळ करतानाचा व्हिडीओ आहे. माझ्यासोबत काही गोष्टींना हा म्हणालीस तर मी हा व्हिडीओ व्हायरल करणार नाही. जर तू नाही म्हणालीस तर मी हा व्हिडीओ व्हायरल करुन टाकेन, त्यावेळेस मला मित्राने सांगितलं की, माझ्या घरी असा विषय झालाय, तू अर्जंट तिथे जा. ती घटना ऐकल्यानंतर माझं डोकं अत्यंत संतापलं. त्यातून मी त्याला त्यावेळेस मारहाण केली आहे. यातील खरं कारण हे आहे. त्याला वेगळं वळण दिलं जात आहे. जातीचं वळण दिलं जातंय, तसेच राजकारणाचं वळण दिलं जातंय”, अशी प्रतिक्रिया सतीश भोसले याने दिली.
Suresh Dhas : सुरेश धस यांचा खोक्या भाईबद्दल खुलासा, जाहीर केले सतीश भोसले सोबतचे नेमके काय संबंध
“माझ्या मित्राकडे त्याचे पूर्ण व्हिडीओ आहेत. त्याला 10 लाखांनी फसवले आहे, त्याचे ट्रान्झेक्शनचे पुरावे आहेत. मित्राने रितसर त्याच्याविरोधात तक्रार दिली आहे. अहो त्याच्या पत्नीसोबत हे प्रकार करायचे का? तिने उद्या जीवाचं काही करुन घेतलं असतं तर सगळ्यांनी हातात कॅन्डल घेऊन मूक मोर्चा काढायचा होता का? आज त्याला दोन कानशिलात लगावले तर काय फरक पडला?”, असा सवाल सतीश भोसले उर्फ खोक्या भाईने केला.
यावेळी सतीश भोसले याला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्याने भूमिका मांडली. “अंजली दमानिया ताईंना चुकीची माहिती पुरवली जाते. त्यांना चुकीची माहिती पुरवल्यामुळे त्या ते बोलतात. गुंड कशाला म्हणताय? माझे सामाजिक कार्यक्रम बघाना”, असं हा खोक्या भाई म्हणाला.

