Uddhav Thacketay Speech : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचा पराभव ज्या पद्धतीने झाला त्याची कल्पना कुणालाही नव्हती. महाविकास आघाडीच्या या पराभवावर उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच आपल्या भाषणात मोठं वक्तव्य केलं आहे.
“लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका आल्या. मधल्या काळात मतदारांचे घुसवाघुसवी झाली. आपण ज्या मानसिकतेत होतो की, आपल्याला जिंकायचंच आहे त्या मानसिकतेत महायुती होती आणि आम्ही जिंकलो आहोत, अगदी आपले मित्रपक्ष सुद्धा जॅकेट शिवून तयार होते. बस आता जिंकलोच, मी घोड्यावर बसणार आणि विधानसभेत जाणार. त्या निकालानंतर मला काही जणांनी सांगितलं, काँग्रेसवाले काही लोक आले, राष्ट्रवादीवाले काही आले, आणि म्हणाले एक चूक झाली ती झालीच. ते नाव जाहीर करायचं सोडून द्या. त्याचा इतिहास झाला. पण त्यांनी सांगितलेलं फार महत्त्वाचं होतं. विधानसभेत आपण केलेलं काम हे जागांच्या साठेमारीत आपणच मारुन टाकलं”, असं उद्धव ठाकरे जाहीरपणे म्हणाले.
‘लोकांना आपण आपलं काम सांगूच शकलो नाही’
“हे खरं आहे. आपण काय करत गेलो? तुम्ही किती देणार? एवढे, तुम्ही काय करणार हे, आम्ही हे, याच्यात राहिलो. अरे पण आपण उत्तमरित्या सरकार चालवून दाखवलं. जगभरात आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती होती त्यावेळीही आपण महाराष्ट्र थांबू दिला नव्हता हे आपण लोकांना सांगूच शकलो नाही. तेच काम त्यांनी केलं. भ्रष्टाचाराचा नुसता आगडोंब केला. इथे सुरज बसला आहे. काय? खिचडी घोटाळा? संजय राऊतला आतमध्ये टाकलं होतं. पण घाबरुन सोडून दिलं. जा बाबा जा. तिकडे गेलास तर बरं. काही शेपट्या घालून गेले. त्या सगळ्यांना तिकडे घेऊन जणू काही गंगास्नान घातलं”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
Gaurav Ahuja : पुण्यात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाची BMW गाडी जप्त होणार? वकिलांकडून महत्त्वाची माहिती
विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एकदिवस आधी महाविकास आघाडीला आपल्या विजयाची खात्री होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार यावरुन मविआत विविध दावे केले जात होते. तसेच विधानसभा निवडणुकीवेळी जागावाटपावरुन मविआत प्रचंड संघर्ष बघायला मिळाला होता. तसेच काही ठिकाणी झालेली बंडखोरी यामुळे त्याचा मविआला फटका बसला होता. हेच उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे मान्य केलं आहे.

