• Mon. Jun 8th, 2026

    Suresh Dhas : ‘सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता’, सुरेश धस यांची कबुली, मारहाणीच्या व्हायरल व्हिडीओवर नेमकं काय म्हणाले?

    Suresh Dhas : ‘सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता’, सुरेश धस यांची कबुली, मारहाणीच्या व्हायरल व्हिडीओवर नेमकं काय म्हणाले?

    Suresh Dhas on Beed Viral Video : बीडचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडीओत एक तरुण एका पुरुषाला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. संबंधित तरुण हा त्या व्यक्तीच्या तळपायावर बॅटने अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. या घटनेत मारहाण करणारा व्यक्ती हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली होती. सुरेश धस यांनी मारहाण करणारी व्यक्ती हा आपला कार्यकर्ता असल्याचं देखील मान्य केलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बीड : बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीच्या व्हिडीओवर भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेत एका व्यक्तीला निर्घृणपणे मारहाण करणारा व्यक्ती हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली होती. अखेर सुरेश धस यांनी मारहाण करणारी व्यक्ती ही आपला कार्यकर्ता असल्याचं मान्य केलं आहे. संबंधित कार्यकर्त्याचं नाव सतीश भोसले आहे. सुरेश धस यांनी सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता असल्याचं स्पष्ट म्हटलं आहे.

    “सतीश भोसले हा आमचा कार्यकर्ता असला तरी कारवाई करा. संबंधित घटनेची माहिती पोलिसांकडून घेतली. यावेळी ही घटना दीड वर्षांपूर्वी घडल्याची माहिती मिळाली. मुलीची छेड काढण्याच्या घटनेवरन ही मारहाण झाली होती”, असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं आहे. सतीश भोसले या कार्यकर्त्याविरोधात तक्रार आल्यास कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचं देखील सुरेश धस यांनी यावेळी सांगितलं आहे.

    सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

    “सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता आहे. मी आता सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना फोन केला. हा घटनेचा प्रकार काय आहे? याची चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की, दीड वर्षांपूर्वीची ही घटना आहे”, असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं.

    “आमच्या इथे ऊसतोड कामगार खूप असतात. ही घटना कुठल्या तरी एका कारखान्यात घडली आहे. मुलीच्या छेडछाडीवरुन ती घटना घडली आहे. या घटनेची कुठेही केस झालेली नाही. मी स्पष्टपणे सांगून ठेवलं आहे की, जरी माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्याबाबतीत काही तक्रार आली तर ती नोंद करा आणि त्यावर योग्य ती कारवाई करा”, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली.
    Maharashtra Politics : जेव्हा आदित्य ठाकरे आणि मंत्री नितेश राणे एकमेकांसमोर येतात
    दरम्यान, संबंधित व्हिडीओ हा खरंच जुना आहे का? तो खरंच जुना असेल तर आताच सोशल मीडियावर व्हायरल का करण्यात आला? हे व्हिडीओ व्हायरल करण्यामागे कुणाचा काही हेतू होता का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जालन्यातील भोकदन येथे एका व्यक्तीला तापत्या सळईचे चटके दिल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. अशा परिस्थितीत शिरुर तालुक्यातील व्हिडीओ समोर आला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed