• Fri. Jul 31st, 2026

    आपत्ती निवारणासाठी प्रशासन अलर्ट; पूरप्रवण भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 31, 2026
    आपत्ती निवारणासाठी प्रशासन अलर्ट; पूरप्रवण भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश – महासंवाद

    यवतमाळ, दि. ३१: दारव्हा तालुक्यातील दहेली येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाची तातडीची आढावा बैठक घेत आपत्ती व्यवस्थापनासाठी तत्काळ उपाययोजना करुन सतर्क राहण्याचे तसेच पूरप्रवण भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

    दारव्ह्यातील दहेली दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी अनिल खडांगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मुन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे आदी अधिकारी उपस्थित होते.

    या बैठकीत भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच पालकमंत्री संजय राठोड यांनी तत्काळ उपाययोजनांचे निर्देश दिले. ते म्हणाले, दहेली येथील दुर्घटनेची चौकशी करुन जबाबदारी निश्चित करावी. संबंधित ठेकेदार किंवा विभागाचा निष्काळजीपणा आढळल्यास कठोर कारवाई करावी, सुरक्षा नियमांचे पालन झाले का याची तपासणी करुन दोषींवर कारवाई करावी.

    याबरोबरच पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यामध्ये पूरप्रवण गावांची अद्ययावत यादी करावी, धोकादायक पूल, रस्ते व नाल्यांचे सर्वेक्षण करा, 24×7 आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवा, हवामान विभागाच्या इशाऱ्यांची त्वरित माहिती गावागावात पोहोचवा, आवश्यक बचाव साहित्याचा कायमस्वरूपी साठा उपलब्ध करा, नदी-नाले व पुलांवर पाणी आल्यास तत्काळ वाहतूक बंद करा, नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखणे, गावातील स्वयंसेवक बचाव पथक तयार करणे, वृद्ध, दिव्यांग व लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवणे, आपत्कालीन संपर्क क्रमांक प्रत्येक गावात उपलब्ध करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

    यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात येणाऱ्या साहित्यांची व्यवस्था, पोहता येणाऱ्या नागरिकांची तालुकानिहाय यादी तयार करणे, त्यांना नियमित प्रशिक्षण देणे, अग्निशमन, एसडीआरएफ व एनडीआरएफसोबत समन्वय ठेवणे, आपत्कालीन संपर्क यादी तयार करणे, प्रत्येक तालुक्यात स्वयंसेवी रेस्क्यू टीम तयार करणे, पूरग्रस्त रस्त्यांवर बस सेवा तात्काळ बंद करणे, चालक-वाहकांनी धोकादायक परिस्थितीची माहिती नियंत्रण कक्षाला देणे, प्रवाशांना पर्यायी मार्गाची माहिती देणे, प्रशासनाशी सातत्याने समन्वय ठेवणे, पाणी वाहत असलेल्या पुलावरून वाहन नेऊ नये, प्रशासनाने बंद केलेला रस्ता वापरू नये, हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये. शाळा, महाविद्यालये व ग्रामसभांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण द्यावे. पूरप्रवण पुलांवर पाणीपातळी मोजणारे सेन्सर बसवावे, स्वयंचलित सायरन यंत्रणा उभारावी, सीसीटीव्ही व रिमोट मॉनिटरिंग व्यवस्था करावी, प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन साहित्य केंद्र उभारणे, दरवर्षी मान्सूनपूर्व मॉक ड्रिल आयोजित करण्याचेही निर्देश पालकमंत्री राठोड यांनी यंत्रणांना दिले.

    दहेली येथील दुर्घटनाग्रस्तांची पालकमंत्र्यांकडून विचारपूस

    दहेली गावाजवळून वाहणाऱ्या अडाण नदीच्या पुलावरून मध्यरात्रीच्या सुमारास एर्टिगा कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या दुर्घटनेत आर्णी तालुक्यातील लोणी येथील रहिवासी अविनाश खंडारे यांना वाचवण्यात आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथकाला यश आले. मात्र, त्यांच्या पत्नी माधवी खंडारे तसेच दोन मुली प्राची व साची या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान या तिघींचेही मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री राठोड यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अविनाश खंडारे यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करुन सांत्वन केले. तसेच तत्काळ मदतकार्य व आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed