• Thu. Jun 11th, 2026

    NCP Meet : राष्ट्रवादीच्या गोटातली मोठी बातमी! ‘देवगिरी’वर खलबतं; मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पक्षाची पहिली बैठक

    NCP Meet : राष्ट्रवादीच्या गोटातली मोठी बातमी! ‘देवगिरी’वर खलबतं; मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पक्षाची पहिली बैठक

    NCP meet at Ajit Pawar Bungalow : अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची ही पहिली बैठक आहे. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. हे अधिवेशन काल सोमवारपासून सुरु झालंय. अधिवेशनाचा पहिलाच दिवस हा वादळी ठरला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी यासाठी विरोधक सभागृहात आक्रमक झालेले बघायला मिळाले. तसेच विरोधकांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठीदेखील आक्रमक पवित्रा घेतला. विशेष म्हणजे काल रात्री संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला. अखेर आज सकाळी धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

    धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधक मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक होऊ शकतात. याची पूर्वकल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे. या संभाव्य घडामोडी लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या सर्व नेते आणि मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते आणि मंत्री उपस्थित आहेत. असं असलं तरी माजी मंत्री छगन भुजबळ या बैठकीत गैरहजर असल्याची माहिती आहे.

    बैठकीत मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत चर्चा?

    माणिकराव कोकाटे यांना नाशिक दिवाणी न्यायालयाने एका प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेनंतर माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली आणि त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला. या प्रकरणी उद्याच सुनावणी होणार असून न्यायालयाकडून उद्या निकालाचं वाचन केलं जाण्याची शक्यता आहे. अशावेळी न्यायालयाने शिक्षेवरील स्थगितीची मागणी मान्य केली नाही तर माणिकराव कोकाटे यांनादेखील मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता धरावा लागू शकतो. याचबाबत विशेष चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती आहे.

    राष्ट्रवादीत आता कुणाला मंत्रिपदाची संधी?

    धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांची जागा मंत्रिमंडळात रिक्त झाली आहे. तसेच माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला तर आणखी एक जागा कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत कोणाला संधी द्यावी? याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. अजित पवार या बैठकीत सर्वानुमताचा विचार करुन कुणाला मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतील? याबाबत उत्सुकता आहे. सध्या तरी माजी मंत्री अनिल पाटील, छगन भुजबळ आणि आमदार प्रकाश सोळंके यांच्या नावांची चर्चा आहे. तरीही अंतिम शिक्कामोर्तब कुणाच्या नावावर होणार? ते पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, या बैठकीत अजित पवार हे महायुतीमधील अंतर्गत वादावर चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच ते पक्ष बांधणीबाबत आढावा घेणार असल्याची माहिती आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed