Maha Vikas Aghadi Aggressive on Mahayuti Government : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आहे. मविआ नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर त्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अंबादास दानवे यांनी सरकारवर सडकून टीका केली.
“मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. बीड प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याला कशापद्धतीने व्हीआयपी वागणूक दिली जात आहे, आमच्या पक्षाचे सूरज चव्हाण हे इथे बसले आहेत. ते 1 वर्ष 1 महिना जेलमध्ये राहिले आहेत. एकीकडे तुरुंगात छळ केला जातो, दुसरीकडे वाल्मिक कराड सारख्या आरोपींना ज्यांनी मुडदा पाडले आहेत त्यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
‘हे दुर्दैवं आहे’
“काही जिल्ह्यांमध्ये दारुबंदी आहे. विशेषत: वर्धा, गडचिरोली जिल्ह्यांत दारुबंदी असताना 7 हजार गुन्हे दारु विषयी नोंद झाले आहेत. महिला अत्याचाराच्या घटना राज्यात घडत आहेत. मालाड, बदलापूर, अमरावतीमध्ये घटना घडल्या. सरकार यावर कोणतीही भूमिका घेत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पकडला जात नाही. हत्येच्या घटनेला तीन महिने झाले असताना आरोपी पकडला जात नाही. हे दुर्दैवं आहे की, या गावकऱ्यांना उपोषणाचा निर्णय घ्यावा लागतो. पण अजूनही त्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत”, असं अंबादास दानवे म्हणाले.
‘भतगसिंह कोश्यारी यांनी सुरु केलेली परंपरा…’
“हे सगळं होत असताना प्रशांत कोरटकर सारखा व्यक्ती हे कुणाशी संबंधित आहे, ते इंद्रजीत सावंत यांच्यासारख्या थोर इतिहास संशोधकांना फोन करुन धमकी देते, या प्रशांत कोरटकरला सरकार सुरक्षा देते? खरंतर प्रशांत कोरटकरला बेड्या ठोकून जेलमध्ये टाकायला हवं होतं. माजी राज्यपाल भतगसिंह कोश्यारी यांनी सुरु केलेली महापुरुषांचा अवमान करण्याची परंपरा हे लोकं सुरु ठेवत आहेत. त्यांना सरकार संरक्षण देत आहेत. कोरटकर असेल किंवा राहुल सोलापूरकर असेल, हे एकाच माळ्याचे मनी आहेत. या लोकांवर सरकारने एकही कारवाई केलेली नाही”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
‘भ्रष्टाचारावर सरकारचा पांघरुन घालण्याचा प्रयत्न’
“कृषी विभागात 300 कोटींचा घोटाळा झालेला आहे. आरोग्य विभागाच्या निघालेल्या टेंडरला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. एसटीचं 1310 बसांचं टेंडर निघालं होतं त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. याचाच अर्थ महायुतीचं याआधीचं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार होतं. या भ्रष्टाचारावर सरकार पांघरुन घालण्याचं प्रयत्न करत आहे”, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
Eknath Shinde : ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त; कारण काय?
‘अशा सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमाला जाणं म्हणजे…’
“सुरक्षेच्या कारणास्तव आरटीओकडून लावल्या जाणाऱ्या नंबरप्लेटच्या किंमती या इतर राज्यांच्या तुलनेत तीन पट आहे. कोणत्या तरी एजन्सीला मोठं करण्यासाठी हे काम केलं जात आहे”, असादेखील आरोप अंबादास दानवे यांनी केला. “कृषी विभागाने बदल्यांच्यामध्ये जे केलं आहे ते समोर आलं आहे. अशा पद्धतीने भ्रष्टाचार करणारे कृषीमंत्री जे आता वेगळ्या खात्याचे मंत्री आहेत, अशा सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमाला जाणं म्हणजे हे जनतेच्या भावनांचं अवमान होईल”, अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली.

