Jitendra Awhad tweet about Rahul Solapurkar : छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे राहुल सोलापूरकर यांना मानाचं पान मिळाल्याची चर्चा आहे. राहुल सोलापूरकर यांची पुणे सांस्कृतीक धोरण समितीत सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
“पुण्याचे सांस्कृतिक धोरण आणि अंमलबजावणी यासाठी एक समिती निर्माण करण्यात आली. या समितीमध्ये ‘थोर’ इतिहास संशोधक राहुल सोलापूरकर यांना संधी देण्यात आली. आता आपल्याला कळलेच असेल की, सोलापूरकर जे बोलतो ते कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो आणि त्याला राजाश्रय कुणाचा आहे”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेच्या घटनेवर भाष्य केलं होतं. यावेळी शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटका करुन घेण्यासाठी तिथल्या सैनिकांना लाच दिल्याचं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या. राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलने झाली होती. यानंतर राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितली होती. पण त्यानंतर सोलापूरकर यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीदेखील वादग्रस्त वक्तव्य समोर आलं होतं. या दोन्ही प्रकरणांमुळे राज्यातील वातावरण तापलं होतं. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या नव्या ट्विटने वातावरण तापू शकतं.
Suspense in Maharashtra Politics : ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या आमदाराचाच अजित पवारांसोबत एकाच गाडीने प्रवास
सोलापूरकरांच्या नियुक्तीने वादाची शक्यता
राहुल सोलापूरकर यांची पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक धोरण तज्ज्ञ सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सोलापूरकर यांच्यावर टीका केली. तसेच “सोलापूरकर जे बोलतो ते कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो आणि त्याला राजाश्रय कुणाचा आहे? हे आपल्याला आता कळलेज असेल”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

