• Fri. Jul 24th, 2026

    Nashik Rain : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, गंगापूर धरणातून 19 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग

    Nashik Rain : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, गंगापूर धरणातून 19 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग

    नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण भरलं आहे. यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदीत 19 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टी, उद्भवलेली पूरस्थिती, बचाव कार्य, झालेले नुकसान या संदर्भात आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, मनपा वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी, लोक प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत बैठक संपन्न झाली. नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. पूर परिस्थिती निर्माण झाली असली तरी सुदैवाने नाशिक जिल्ह्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिली. दरम्यान, उद्यापासून जिल्ह्यात ग्रीन अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

    जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, धोका अजून पूर्णपणे टाळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. याचबरोबर पाणी उकळून प्यावे. तसेच डेंग्यू, मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता घ्यावी. याचबरोबर सध्या गंगापूर धरणातून 19000 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदीमध्ये कायम असल्याने गोदावरी नदीची पाणी पातळी ही वाढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये नदी किनारी जाणे टाळावे तसेच व्यावसायिकांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

    12 टीएमसी पाणी विसर्जित

    सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर धरणात सध्या 96 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या दोन दिवसात 119 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा हा 85 टक्के येईपर्यंत पाणी विसर्ग सुरू राहणार आहे. तर आतापर्यंत नाशिक विभागातून एकूण 12 टीएमसी पाणी हे विसर्जित करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

    जायकवाडीला पाणी सोडण्यावरून आमदार फरांदे आक्रमक

    दुसरीकडे जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आक्रमक भूमिका घेतली. समन्यायी पाणी वाटपाचा कायदा आहे. तर तो मग एकतर्फी का? असा प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. नाहीतर आम्ही याच्याकडे लक्ष देऊ, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

    जायकवाडी धरणाचा मृत 24 टक्के साठा हा वापरला जातोय आणि पुन्हा तो भरून देण्यासाठी नाशिकमधून पाणी सोडलं जातं. तो साठा पुन्हा भरून द्यावा लागतो. त्यामुळे नाशिककरांवर अन्याय होत असल्याचं देवयानी फरांदे यांनी यावेळी म्हटलं.

    देवयांनी फरांदे यांचा इशारा

    जायकवाडीमधील मृत साठा हा किती वापरला जातो याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. हे लक्षात आणून द्यायचे काम अधिकाऱ्यांचे आहे. तर अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली काम करू नये, असे देखील त्यांनी यावेळी खडसावले. तर या गोष्टीकडे अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे. अन्यथा आम्ही याकडे लक्ष देऊ, असा इशारा आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत आमदार फरांदे यांनी दिला.

    राहुल ढिकले यांच्या प्रशासनाला सूचना

    रामकुंड परिसरात पडलेल्या खड्यांच्या मुद्द्यावरून प्रशासनाला काम वेळीच पूर्ण करण्याच्या सूचना आमदार राहुल ढिकले यांनी दिल्या आहे. मुंबई सारख्या घटना घडू नयेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ रामकुंड परिसरात पडलेल्या खड्ड्याकडे लक्ष द्यावे आणि ती कामे पूर्ण करावी, अशा सूचना आमदार राहूल ढिकले यांनी दिल्या.