• Sat. Jun 13th, 2026

    संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा का? रामदास आठवले यांचं स्पष्ट वक्तव्य

    संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा का? रामदास आठवले यांचं स्पष्ट वक्तव्य

    बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांना घेरलं आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत आहे. विरोधकांच्या या मागणीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज प्रतिक्रिया दिली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    सोलापूर : मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन सातत्याने निशाणा साधला जातोय. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक झाली आहे. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधकांच्या या मागणीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज प्रतिक्रिया दिली. ते पंढरपूरमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.

    “धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्या जवळचे मित्र होते ही गोष्ट खरी आहे. दोघे परळीमध्ये राहणारे आहेत. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचा हात असल्याचं कुठे दिसत नाहीय. पण विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. विरोधकांना राजीनामा मागण्याचा अधिकार आहे आणि राजीनामा द्यायचा की नाही तो अधिकार धनंजय मुंडे यांना आहे”, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली.

    “स्वत: अजित पवार सांगत आहेत की या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा संबंध दिसत नाहीय. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा की नाही हे त्यांच्यावर अवंबून आहे. पण मला असं वाटतं की या प्रकरणाची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्यांचा संबंध दिसत नाही”, अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली.

    ‘राज ठाकरेंच्या पक्षाची महायुतीत गरज नाही’

    “मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेची अजिबात आवश्यकता नाही. विधानसभा निवडणुकीत मनसे सोबत नसताना आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जागा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे मनसेला मुंबईत सोबतला घेतलं तर उत्तर भारतीय मतदार आणि गुजराती भाषिक मतदार हे राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करणारे मतदार आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सोबत घेऊन फारसा फायदा होणार नाही, असं मला वाटतं. रिपब्लिक पक्ष असताना राज ठाकरेंच्या पक्षाची महायुतीत गरज नाही, असं माझं मत आहे”, असं रामदास आठवले म्हणाले.
    अजित पवारांचा सवाल, हलक्यात घेऊ नका कुणाला म्हणाले? एकनाथ शिंदेंचं भर सभागृहात उत्तर

    ‘भारत-पाकिस्तान सामन्याचं मला निमंत्रण’

    “भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं मला निमंत्रण होतं. पण इकडे कार्यक्रम असल्याने मी इथे आलो आहे. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या खेळात राजकारण आणण्याची आवश्यकता नाही. आजची मॅच आम्ही जिंकू याची मला खात्री आहे. भारत-पाकिस्तानची मॅच व्हायला हरकत नाही. ती मॅच आता होत आह”, अशीदेखील प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed