• Thu. Mar 19th, 2026
    ‘ऑपरेशन टायगर’चे पुढील लक्ष्य ठरले? राजन साळवींनंतर कोकणातील आणखी एक शिलेदार शिंदेंच्या गळाला?

    Bhaskar Jadhav may leave Shivsena UBT : शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मंत्री उदय सामंत यांनी या ऑपरेशनचे दावोस मधून सुतोवाच केले होते. त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बडे नेते गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. यातच आता उद्धव ठाकरेंचे कोकणातील शिलेदार गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे देखील ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    रत्नागिरी : शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मंत्री उदय सामंत यांनी या ऑपरेशनचे दावोस मधून सुतोवाच केले होते. त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बडे नेते गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. राजन साळवी यांना आपल्याकडे खेचत शिंदेंनी पहिला डाव टाकला आहे. यातच आता उद्धव ठाकरेंचे कोकणातील शिलेदार गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे देखील ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. भास्कर जाधव यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात ही चर्चा रंगली आहे.

    भास्कर जाधवांच्या नाराजीच्या चर्चा

    विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून भास्कर जाधव पक्षात आपल्याला डावलले जात असल्याचे वारंवार विधान करत आहेत. त्यांनी आताही सूचक विधान केलं आहे. ‘मला योग्य संधी मिळाली नाही, आज माझं वाढतं वय आहे. मला दुःख आहे, योग्य वेळेला मला जर संधी मिळाली असती तर हा भास्कर नावाप्रमाणे महाराष्ट्राला भास्कर दिसला असता,’ असे भास्कर जाधव म्हणाले.

    भास्कर जाधवांनी पुढे शिंदे गटातील मोठ्या इन्कमिंगवर देखील सवाल उपस्थित केले आहेत. ‘पक्ष सोडून जाणारे तिकडं का जात आहे? पलीकडे जाऊन काय फायदा आहे? जे कोण पक्ष सोडून जात आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे त्याची आपल्याला गरज आहे का? आता तिकडे एवढी एसटी फुल झाली आहे तिथं आता तुम्हाला एका कोपऱ्यात जाऊन उभे राहायला लागणार आहे,’ असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे राजन साळवींवर टीका केली आहे.
    Uddhav Thackeray : मशाल सोडून धनुष्यबाण हाती, एकामागून एक शिलेदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याची प्रमुख कारणं काय?
    दरम्यान भास्कर जाधव हे शिंदे गटाशी सलगी साधण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. ‘ज्याच्याकडे दात आहेत त्याच्याकडे चणे नाहीत आणि ज्याच्याकडे चणे आहेत त्याच्याकडे दात नाहीत अशी परिस्थिती माझी झाली आहे, अशी खंत जाधवांनी व्यक्त केली. तर माझ्याबद्दल उदय सामंत हल्ली खरोखरच चांगलं बोलत आहेत. उदय सामंतांच्या मनामध्ये काय आहे? मला माहित नाही. पण ते आदराने वागत आहेत, त्यांच्या या टिप्पणीमुळे ते शिंदे गटाशी सलगी साधण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते.

    राजन साळवींवर टीकास्त्र

    ठाकरेंचे निष्ठावान म्हणवले जाणारे राजन साळवी शिंदे गटात सामील झाले आहेत. यावरूनही भास्कर जाधवांनी साळवींवर टीका केली. राजन साळवींना नेहमी मी एकमेव निष्ठावान म्हणायचो, ही बिरुदावली तुम्हाला लावावी का? हे राजन साळवींना विचारा, असे जाधव म्हणाले. राजन साळवी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश का झाला नाही, तिथे विरोध कोणी केला? जाणाऱ्यांनी आणि येणाऱ्यांनी आपण जाण्याची आणि येण्याची वेळ आपल्या दृष्टीने योग्य आहे का? असे सवालही जाधवांनी उपस्थित केले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed