• Thu. Aug 6th, 2026

    पाटबंधारे विकास महामंडळांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 14, 2025
    पाटबंधारे विकास महामंडळांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद




    मुंबई दि. १४ :  पाटबंधारे विकास महामंडळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन ती स्वयंपूर्ण झाली पाहिजेत. यासाठी महामंडळाने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या नियमाक मंडळाच्या बैठकीत दिल्या.

    गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची ८४ वी बैठक सह्याद्री अतिथी गृह येथे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, श्री. गवळी यांच्यासह वित्त व नियोजन विभागाचे व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले, महामंडळाकडे स्वतःचे उत्पन्न वाढले तर सिंचन प्रकल्पाची अनेक कामे  मार्गी लागतील. या वाढीव उत्पन्नातून उपसा सिंचन  योजनांचा  देखभाल  दुरुस्तीचा खर्च भागवणे शक्य होईल. उत्पन्न  वाढीसाठी महामंडळाच्या ताब्यात असलेल्या जमिनीची माहिती संकलित करावी. या जागांची मोजणी करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

    जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये  रूपांतर करण्यासाठी याचे सर्व्हेक्षण करावे. हे काम  कालबद्ध रीतीने करावे. नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या कामांचे सूक्ष्म नियोजन करून ती गतीने पूर्ण करावीत. महामंडळासाठी कायदा सल्लागाराची नेमणूक करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. गोदावरी नियामक मंडळाच्या ८४ व्या बैठकीत १२ कामांना मान्यता देण्यात आली.

    ००००

    एकनाथ पोवार/विसंअ







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *