• Sun. Jun 14th, 2026

    पडद्यामागे खुसूरफुसूर, शिंदेंच्या शिलेदारांनी घेतली शरद पवारांची भेट, नव्या राजकीय समीकरणाचे संकेत?

    पडद्यामागे खुसूरफुसूर, शिंदेंच्या शिलेदारांनी घेतली शरद पवारांची भेट, नव्या राजकीय समीकरणाचे संकेत?

    शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराजीचं वातावरण आहे. खासदार संजय राऊत यांनी तर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर आज शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के यांनी शरद पवारांची दिल्लीतील निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रियादेखील महत्त्वाची आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा काहीच भरोसा नाही. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण येताना दिसत आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचं कौतुक करण्यात आलं. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला योग्य दिशा दिली, असं शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत संतापले. या घडामोडी घडल्यानंतर आणखी वेगळ्या घडामोडी दिल्लीत बघायला मिळाल्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. यानंतर उदय सामंत यांनी दिलेली प्रतिक्रिया ही नव्या राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

    ‘आधी एकनाथ शिंदेंना बोलू मग सांगू’

    “आम्ही भेटलो म्हटल्यावर काहीतरी राजकीय चर्चा होणारच आहे. पण साहित्य संमेलनाची चर्चा नक्की झाली. साहित्य संमेलनात सरकार म्हणून आम्ही सर्व सोबत आहोत हे त्यांना सांगितलं. तसेच जी चर्चा माझी आणि नरेश म्हस्के यांची शरद पवार यांच्यासोबत झाली त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलू मग तुम्हाला सांगू. आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आहेत. त्यांच्यामुळे आम्ही मंत्रिपदावर बसलेलो आहोत. त्यामुळे शरद पवारांना का भेटलो, काय चर्चा झाली हे एकनाथ शिंदे यांना सांगितलं पाहिजे ना”, अशी सूचक प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

    ‘काही गोष्टींमध्ये आम्ही राजकीय निर्बंध पाळतो’

    “तुम्ही या भेटीचा कसाही अर्थ लावू शकता. ही भेट कशासाठी होती हे देखील मी विश्लेषण करुन सांगितलं आहे. तुम्ही मला असं विचारलं की, काल एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला त्यावर पोटशूळ उठली याबाबत काही चर्च झाली का? यावर एवढी चर्चा झाली मग त्यावर भेटीत चर्चा होणारच आहे. मला असं वाटतं ज्या गोष्टी मी ऐकल्या आहेत किंवा नरेश म्हस्के यांनी चर्चा केली आहे, काही गोष्टींमध्ये आम्ही राजकीय निर्बंध पाळतो”, असंदेखील उदय सामंत यावेळी म्हणाले.

    ‘पवारांना कल्पना दिली की…’

    “आम्ही शरद पवारांना कल्पना दिली की, साहेब तुमच्या घरी भेटायला येत असताना फार मोठ्या संख्येने आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त माध्यमांचे प्रतिनिधी उभे आहेत, हेही त्यांना सांगितलं. पण राजकीय चर्चा कुठलीही झाली नाही. नरेश म्हस्के यांच्यासोबत लोकसभेच्या चर्चेबाबत चर्चा झाली. साहित्य संमेलनात शासन म्हणून आम्ही कसा सहभाग घ्यावा, याबाबत चर्चा झाली”,अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.
    ठाकरेंचा शिलेदार गळाला, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘…म्हणून मी मुख्यमंत्री झालो’

    ‘शरद पवारांच्या भेटीत संमेलनाबाबतच्या चर्चा’

    “शरद पवार यांची ही सदिच्छा भेट होती. मी, खासदार नरेश म्हस्के आणि संजय नाहर आम्ही एकत्र शरद पवार यांची भेट घेतली. यामागचं कारणं असं होतं की, मी राज्याच्या मराठी भाषा मंत्री आहे. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. त्यामुळे मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे साहित्य संमेलनाचा आढावा घ्यायला आलो होतो. शरद पवार यांना स्वागताध्यक्ष म्हणून भेटणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आम्ही त्यांची भेट घेतली. ही भेट घेऊन संमेलनाबाबतच्या ज्या चर्चा होत्या त्या आम्ही केल्या”, असंदेखील उदय सामंत म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed